पुणे प्रतिनिधी: काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ, राज्यात भाजप आणि शिवसेना आक्रमक झाल्याच पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान भाजपकडून सावरकर गौरव यात्रेच ठिकठिकाणी आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोथरूड भागात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार पावसात सावरकर गौरव यात्रा पार पडली. यावेळी सावरकरजी के सम्मान में कोथरुडकर मैदान में, मैं भी सावरकर अशा घोषणा देण्यात आल्या.
या यात्रेत माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपाचे आजी माजी पदाधिकारी सहभागी झाले होते. तर आजच्या दिवशी शहरातील अनेक भागात सावरकर गौरव यात्रा पार पडली आहे.
आणखी वाचा- शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडतील? चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान; म्हणाले…
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांमुळे ब्रिटिशांना भारतातून जावं लागलं आहे. कॉंग्रेसचे नेते सातत्याने महापुरुषांचा अपमान करत असून विरोधकांचं महापुरुषांप्रतीचं प्रेम बेगडी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान देशातील नागरिक कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. असा इशारा यावेळी त्यांनी विरोधकांना दिला.