पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. ड्रंक अँन्ड रन प्रकरणी अल्पवयीन मुलाला अटकही करण्यात आली. परंतु, या प्रकरणात अल्पवयीन चालकाला वाचवण्याचा प्रयत्न वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. सुनील टिंगरे यांचे विरोधक बापूसाहेब पठारे यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी शरद पवार पुण्यातील खराडी येथे बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “सुनील टिंगरे तू कुणाच्या पक्षातून निवडून आलास? हा पक्ष कोणी काढला सगळ्या हिंदुस्थानला माहितीये. त्या पक्षाच्या वतीने तुला संधी दिली. तू सोडून गेला ते ठिकाय. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू, दोन तरुण मुलांना त्यांनी उडवलं काय, जागच्या जागी त्यांची हत्या काय होते, अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करण्याऐवजी हा दिवट्या आमदार पोलीस ठाण्यात जातो आणि चालकाला वाचवतो. यासाठी मते मागितली होती? मतं राष्ट्रवादीच्या नावाने मागितली. शरद पवारांच्या नावाने मतं मागितली. आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं. त्याचं उत्तरदायित्व या पद्धतीने केलं.”
शरद पवार सुरुवातीलाच म्हणाले, “पाऊस आला म्हणून पंतप्रधांनांनी पुण्यातील सभा रद्द केली. पण आम्ही ठरवलंकी पाऊल आला तरी सभा घ्यायचीच. पुण्याचं वैशिष्ट्य काय तर कोयगा गँग. पुण्याची ओळख बजाजचा कारखाना हे पुण्याचं वैशिष्ट्यं होतं, किर्लोस्करांचा कारखाना पुण्याचं वैशिष्ट्यं होतं, पुणे विद्येचे माहेरघर होतं. आणि आता कोयता गँग हे पुण्याचं वैशिष्ट्य झालंय.”
हेही वाचा >> कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाला दिल्लीतील शिक्षण संस्थेने प्रवेश नाकारला
शरद पवार पुढे म्हणाले, मागील वेळी लोकसभेला आम्हाला फक्त चार आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती. पण मी निर्धार केला की विधानसभेला आपण हे चित्र बदलायचे आणि लोक उभे राहिले. आता तर लोकसभेला आपण ३१ जागा जिंकल्यात. मोदी म्हणतात की कुटुंबासाठी विरोधक राजकारण करतात. पण या लोकांचं योगदान नाही का? जवाहरलाल नेहरू १४ वर्षे तुरुंगात होते. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्यांची हत्या झाली. राजीव गांधींनी नवीन तंत्रज्ञान आणले. त्यांची हत्या झाली. ही साधीसुधी माणसे नव्हती आणि नरेंद्र मोदी विचारतात की यांनी काय केले?”
कोणत्या पक्षाला मिळणार जागा?
आगामी विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघातून शरद पवार गटातून बापू पाठारे यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. सध्या या मतदारसंघात महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून अजित पवार गटाला की भाजपाला हा मतदारसंघ सोडला जातो? हे पाहावे लागणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd