बारामती : ‘हिंदी भाषेची सक्ती असू नये; पण हिंदीचा द्वेषही नको. हिंदी भाषेचा द्वेष करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. देशातील ५५ ते ६० टक्के लोक हिंदी भाषा बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी हिंदीकडे दुर्लक्ष करू नये. मात्र, सक्ती योग्य नाही,’ अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली.

विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून वादंग सुरू आहे. याबाबत बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, ‘हिंदी भाषेची सक्ती असू नये. पालकांना निर्णय घेण्याची व्यवस्था असावी.’

आघाडीबाबत लवकरच निर्णय

‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्यावी लागेल. महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करतील आणि लवकरच निर्णय जाहीर होईल. उद्धव ठाकरेंची मुंबईत मोठी ताकद आहे. त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागेल,’ असे शरद पवार म्हणाले.