शिरूर : शिरूर नगरपरिषदेची निवडणूक ‘शिरूर शहर विकास आघाडी’ने न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीचे सर्वेसर्वा, माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी याबाबतची घोषणा केली. लोकशाही क्रांती आघाडीनेही यंदाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिरूर शहर विकास आघाडीही निवडणुकीपासून दूर झाल्याने नगरपरिषदेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शिरूर शहर विकास आघाडीची नगरपरिषदेवर सत्ता असल्याने यंदाच्या निवडणुकीत आघाडीची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. धारिवाल यांनी आघाडी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, सचिव मनसुख गुगळे, पांडुरंग थोरात, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नसीम खान, माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल आदी उपस्थित होते.

धारिवाल म्हणाले, ‘माझा व्यवसाय सातहून अधिक राज्यात विस्तारला आहे. वडील रसिकलाल धारिवाल यांच्या निधनानंतर व्यवसायाचा व्याप एकट्याला सांभाळावा लागतो. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. मी कोणत्याही पक्षात नसून, सर्वपक्षीयांशी चांगले संबंध आहेत. मी राजकारण नाही तर समाजकारण करत आलो आहे. यापुढेही समाजकारण आणि शिरूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे.’

‘नगरपरिषदेत काम करताना वेगवेगळ्या पक्षांतील नगरसेवक, अपक्ष या सर्वांनी साथ दिली. काम करताना भेदभाव न करता सर्वांची कामे केली. विरोधक म्हणून निवडून आलेल्यांची कामे केली,’ असे धारिवाल म्हणाले.

दरम्यान, शिरूर शहराच्या राजकारणात शिरूर शहर विकास आघाडीचे प्रकाश धारिवाल, लोकशाही क्रांती आघाडीचे रवींद्र धनक, भाजपाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या भूमिका निर्णायक राहिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी धनक यांनी लोकशाही क्रांती आघाडी पालिका निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर धारिवाल यांनीही पालिका निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.

निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी

गेली अनेक वर्षे शिरूर शहाराच्या राजकारणात धारिवाल यांचा शब्द अंतिम मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत अनेकजण धारिवाल यांच्या आघाडीकडून लढण्यास इच्छुक होते. मात्र, धारिवाल यांच्या या निर्णयाने इच्छुकांसह शिरूरकरांना धक्का बसला आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

हेही वाचा

‘चिरंजीव लगेच राजकारणात नाही’

‘चिरंजीव आदित्य यांना लगेच राजकारणात आणणार नाही. याबाबतचा निर्णय आदित्य घेतील,’ असे प्रकाश धारिवाल यांनी स्पष्ट केले.