पुणे : पाकिस्तानी गायकाला आमंत्रित केल्याचा आरोप करून शिवसैनिकांनी (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) रविवारी रात्री कल्याणीनगरमधील एका पबसमोर आंदोलन केले. प्रत्यक्षात हा गायक नेदरलँडचा नागरिक असल्याचे स्पष्ट झाल्यावर आंदोलन आवरते घ्यावे लागले.

या पबमध्ये रविवारी सायंकाळी इम्रान नासीर खान याच्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास शिवसैनिक तेथे जमले. गायक पाकिस्तानी असल्याचा दावा करून शिवसैनिकांनी पबमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पबमधील सुरक्षारक्षकांशी (बाऊन्सर) वादावादी झाली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली.

इम्रान खान हा गायक प्रत्यक्षात नेदरलँडचा रहिवासी असल्याची वस्तुस्थिती त्यांनी आंदोलकांना समजावून सांगितली. त्यानंतर कार्यकर्त्यांना आंदोलन तात्पुरते स्थगित करावे लागले. आंदोलनकर्त्याना पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्यात आणले. तेथे आयोजकांना बोलावून घेण्यात आले. आयोजकांनी संगीत रजनीच्या माहिती या वेळी सादर केली.

कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून १४ आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.