पिंपरी: जालनामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर अवघा महाराष्ट्र पेटून उठला आहे. ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. त्याचे पडसाद आज पिंपरी-चिंचवड शहरात देखील उमटले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे चिन्ह असलेल्या मशालीने जाळण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी करत जाळण्यात येत असलेल्या प्रतिमा विझवण्याचा प्रयत्न केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाल्याचे बघायला मिळालं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी निवडणुकांमध्ये शिंदे आणि फडणवीस सरकारला याचा हिशोब द्यावा लागेल. आम्ही मराठा बांधवांच्या आणि भगिनींच्या पाठीशी आहोत असं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी म्हटलं आहे. यावेळी महिला संघटिका सुलभ उबाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा-“…तर महाराष्ट्रातला मनसेचा पहिला खासदार १०० टक्के मीच असेल”, वसंत मोरेंचं मोठं विधान

शहराध्यक्ष सचिन भोसले म्हणाले, माझ्या मराठा बांधवांवर आणि भगिनींवर या सरकारच्या माध्यमातून लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. त्याचा पिंपरी- चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांमध्ये जाहीर निषेध करतो. महाराष्ट्रामध्ये राजकीय अंधार पडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अनाजी पंत आणि गद्दारांची भूमिका त्याचबरोबर जे गद्दार सरकार जे राज्यकर्ते यांना जाळण्याची धमक आणि ताकद ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आहे. ते आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. मशालिने या महाराष्ट्रमधल्या अनाजी पंताला आणि गद्दाराला जाळण्याचं काम केलेलं आहे. या देशांमध्ये लोकशाही असताना आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा अधिकार आहे. आमचा मराठा बांधव आमच्या मराठा भगिनी कायदेशीर पद्धतीने आंदोलन करत असताना ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. अतिशय अमानुषपणे माझ्या महिला भगिनींवर आणि माझ्या बांधवांवर अन्याय झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena thackeray group is aggressive against jalana lathi charge incident kjp 91 mrj