पुणे : शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाच्या आवारातून पसार झालेल्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या आणखी एका सराइताला पोलिसांनी गजाआड केले. न्यायालयातून पसार झालेला आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वेशभूषेत बदल करायचा. दूरचित्रवाहिनीवरील गुन्हेगारीवर बेतलेल्या मालिका पाहून तो वास्तव्याची ठिकाणे बदलत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
या प्रकरणी अनमोल जाधवराव (वय ३६), अक्षय हंपे (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी जाधवराव याच्याविरुद्ध चतु:शृंगी, कोथरूड, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. जाधवरावविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. १९ जुलै रोजी न्यायालयीन सुनावणीसाठी त्याला शिवाजीनगर न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. त्यानंतर तो न्यायालयाच्या आवारातील गर्दीतून पसार झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी जाधवराव याचा माग काढण्यात येत होता. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. तो मोटारीतून अहिल्यानगरमधून वाघोलीकडे येत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळाली. खांदवेनगर भागात सापळा लावण्यात आला. आरोपी जाधवराव आणि त्याचा साथीदार हंपे हे मोटारीत थांबले होते. पोलिसांनी संशयावरून दोघांची चौकशी केली. चौकशीत दोघांवरील संशय बळावला. पोलिसांनी जाधवराव आणि हंपे यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघे फरारी आरोपी असल्याचे समजले.
हंपेविरुद्ध अहिल्यानगर येथील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्याला अहिल्यानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त ऋषीकेश रावले, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी, गुन्हे शाखेचे निरीक्षक धनंजय पिंगळे, उपनिरीक्षक अजित बडे आदींनी ही कामगिरी केली.
गुन्हेगारीवर बेतलेल्या मालिका पाहून पोलिसांना गुंगारा
आरोपी जाधवराव हा गुन्हेगारीवर बेतलेल्या मालिका बघायचा. पोलीस माग कसे काढतात, याची माहिती त्याला होती. त्यामुळे त्याने वेशभूषेत बदल केला होता. तो मोबाइल संचही वापरत नव्हता. नातेवाईक आणि मित्रांशी संपर्क साधण्यासाठी तो मोबाइल हरविल्याची बतावणी करून नागरिकांकडील मोबाइल संच वापरायचा. पसार झाल्यानंतर तो नाशिक, मुंबई, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यातील पौड, मुळशी, हवेली तालुक्यात वेशभूषेत बदल करून वास्तव्य करत होता, अशी माहिती तपासात मिळाली आहे.