Sidhu Moose wala murder case suspect Santosh Jadhav arrested: पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवला अटक केली आहे. गुजरातमधून पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतलं आहे. रविवारी रात्री उशीरा त्याला पुण्यातील जिन्हा न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी जाधव टोळीतील अन्य एका गुन्हेगारालाही ताब्यात घेतलं आहे. मुसेवाला प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात २९ मे रोजी मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवाला खून प्रकरणात पंजाब, राजस्थानमधील लाॅरेन्स बिष्णोई टोळीचा हात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. मुसेवालावर गोळ्या झाडणाऱ्या दहा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. मंचरमधील गुंड संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सौरभ महाकाल मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आरोपी आहेत. यापैकी सौरभ महाकालला काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली असून आता संतोषलाही अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.

सलमान धमकी प्रकरणात झालीय जाधवच्या सहकाऱ्याची चौकशी
संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांनी गेल्या वर्षी आंबेगाव तालुक्यात ओंकार बाणखेले याचा वैमनस्यातून गोळ्या झाडून खून केला होता. तेव्हापासून दोघेजण पसार होते. जाधव आणि महाकाळ पंजाब, राजस्थानात पसार झाले होते. राजस्थानात खंडणीसाठी एका व्यावसायिकावर गोळीबार केल्या प्रकरणी जाधवला अटक करण्यात आली होती. राजस्थानातील कारागृहात तो लाॅरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आलीय. याच बिष्णोई टोळीनेच सलमान खान आणि त्याच्या वडील सलीम खान यांना धमकीचं पत्र पाठवल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे हे पत्र सौरभ महाकाळच्या माध्यमातून पाठवण्यात आलंय का? या पत्राशी महाकाळचा काही संबंध आहे का याचसंदर्भात काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित तसेच मोक्का कारवाईनंतर पसार झालेला आरोपी महाकाळ पुणे जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके आणि पथकाने महाकालला ताब्यात घेतले. महाकालला अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मुसेवाला खून प्रकरणात आतापर्यंत पंजाब पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.

सिद्धू मुसेवालांवर ३० गोळ्या झाडल्या…
सिद्धू मुसेवाला यांची २९ मे २०२२ रोजी काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना हा हल्ला झाला. गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांच्यासोबत जात असतानाच सिद्धू मुसेवालाच गाडी चालवत होते. घरापासून काही अंतरावर असताना अचानक सिद्धू मुसेवाला यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

सिद्धू मुसेवाला यांना चार शसस्त्र सुरक्षारक्षकांची सुरक्षा पुरवण्यात आलेली. या सुरक्षेमध्ये कापत करुन पंजाबमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या भगवंत मान सरकारने केवळ दोन सुरक्षारक्षक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले. सिद्धू मुसेवाला यांच्याकडे बुलेटप्रूफ फॉर्चूनरही आहे. मात्र ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी सिद्धू मुसेवाला हे सुरक्षारक्षकांशिवाय आपल्या थार जीपने दोन मित्रांसोबत प्रवास करत होते.

सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांच्या सांगण्यानुसार मुसेवालांच्या गाडीच्या मागील गाडीमध्ये दोन सुरक्षारक्षकांसहीत ते स्वत: प्रवास करत होते. मात्र अचानक सिद्धू मुसेवालांच्या गाडीला एका एसयूव्ही आणि सेडान गाडीने ओव्हरटेक केला. या प्रत्येक गाडीमध्ये चार शसस्त्र हल्लेखोर होते. या दोन्ही गाड्यांमधून हल्लेखोर खाली उतरले आणि त्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार करुन तिथून पळ काढला.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला यांच्यावर ३० गोळ्या झाडण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन एन-९४ रायफलच्या गोळ्या सापडल्याची माहितीही दिलीय.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidhu moose wala murder case suspect santosh jadhav arrested by pune police from gujrat pune print news scsg