पुणे : बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी पुण्यात मूक आंदोलन केले.

बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने आज २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात काल याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. हा बंद बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट करत राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

हेही वाचा – पिंपरी : पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या शिक्षकाकडून पुन्हा शाळेतील अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे

हेही वाचा – धक्कादायक ! दहावीतील विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारात हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केले. त्या आवाहनाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिसाद देत राज्यभरात ठिकठिकाणी मूक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते मूक आंदोलनास बसले. शरद पवार हे आंदोलनाच्या ठिकाणी तोंडाला काळी मुखपट्टी लावून बसले आहेत. तर अन्य सहभागी नेते मंडळींनी काळ्या फिती बांधल्या आहेत.