पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) विस्तारित स्वारगेट ते कात्रज मार्गिकेच्या निविदा प्रक्रियेला सहा कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. तांत्रिक आणि आर्थिक पडताळणीच्या निकषानुसार कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला साधारणतः दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असून, पुणेकरांच्या दृष्टीने मेट्रोचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.

‘महामेट्रोने राबविलेल्या निविदा प्रक्रियेच्या मुदतीपर्यंत सहा कंपन्यांनी प्रतिसाद दिला. आता निविदा समिती या कंपन्यांची तांत्रिक-आर्थिकदृष्ट्या पडताळणी करून निकषात बसणाऱ्या कंपनीची नियुक्ती करील. त्यानंतर वित्तीय प्रक्रिया पूर्ण करून अखेरची प्रक्रिया अंतिम करण्यात येईल. या प्रक्रियेसाठी साधारणतः अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधी लागेल,’ अशी माहिती ‘महामेट्रो’चे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.

विस्तारित प्रकल्पाचा आढावा

विस्तार – स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्ग
अंतर – ५.४६ किलोमीटर

खर्च – अंदाजे ३,६३७ कोटी
स्थानके – स्वारगेट, मार्केट यार्ड, सहकारनगर (बिबवेवाडी), पद्मावती आणि कात्रज

काय होणार फायदा ?

स्वारगेट ते कात्रज हा रस्ते मार्ग अत्यंत वर्दळीचा असून, उड्डाणपूल असताना या मार्गावर नियमित गर्दी असते. या मार्गावर बिबवेवाडी, धनकवडी, पद्मावती, बालाजीनगर, हा दाट लोकवस्तीचा भाग असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी, अपघात, प्रदूषण अशा अनेक समस्या आहेत. या प्रकल्पामुळे उंड्री, पिसोळी, धनकवडी, बालाजीनगर, बिबवेवाडी परिसरातील स्थानिकांना प्रवास सुकर होणार आहे. विशेषतः शहराच्या हरित आणि शाश्वत विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा महत्वाचा मानला जात आहे.