पुणे: एप्रिलच्या पहिल्याच आठवडय़ात तापमान वाढू लागले असून शुक्रवारी सोलापुरात राज्यातील सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात. विदर्भात आज, शनिवारीही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडय़ात पुढील तीन दिवस रात्रीच्या उकाडय़ात वाढ होण्याचा अंदाज आहे. तर राज्यात पुढील दोन दिवस पारा ४० अंशांवरच राहण्याची शक्यता आहे.

राज्यात शुक्रवारी सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअसची नोंद सोलापुरात झाली. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी ४० अंशांवर होते. विदर्भात पारा सरासरी ४२ अंशांवर होता. मराठवाडय़ात सरासरी तापमान ४० अंश होते. कोकण किनारपट्टीवर सरासरी कमाल तापमान ३२ अंश नोंदवण्यात आले. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कमाल तापमानात अलिबागमध्ये ३.४, डहाणूत १.६, कुलाब्यात १.५ अंश सेल्सिअसने वाढ झाली. पुढील दोन दिवस तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>>“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. प्रत्यक्षात गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी तापमानात सरासरी ०.५ अंश सेल्सिअसने तापमानात घट झाल्याचे आढळले. शनिवारी मात्र तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  येत्या रविवारी आणि सोमवारी विदर्भात गारपीट होण्याचा, तर मंगळवारी, गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याच्या बहुतेक भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. पाऊस झाल्यास कमाल तापमानात किंचित घट होऊ शकते.

हेही वाचा >>>केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप

विदर्भात गारपिटीचा अंदाज

राज्यात बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत. तसेच रविवारपासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. या वाऱ्याच्या संयोगातून विदर्भात रविवारी आणि सोमवारी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी, गुढीपाडव्याच्या दिवशी किनारपट्टीवगळता राज्याच्या बहुतेक भागांत मेघगर्जना आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

बहुतांश मराठवाडा टँकरग्रस्त 

’काहिली वाढत असल्याने धरणांतील पाणीसाठा २२ टक्क्यांवर, जायकवाडीमध्ये फक्त १९ टक्के साठा.

’जलस्रोत आटल्याने मराठवाडय़ातील ६३७ गावांत ९७९ टँकरने पाणीपुरवठा. यांतील ७६४ टँकर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात.

’परळी वैजनाथ, शिरूर कासार या भागातून टंचाईमुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ.

’बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर भागात पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट.

’एका बाजूला सगळी शासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतलेली असताना टंचाईच्या तीव्रतेत वाढ.

गारपीटी कुठे

रविवार : वाशिम, यवतमाळ.

सोमवार : वर्धा, चंद्रपूर, अमरावती.

मंगळवार : किनारपट्टीवगळता राज्यभरात हलक्या सरी