पुणे : जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. या आरक्षणावर हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४७ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या प्रस्तावित सार्वत्रिक निवडणुकांच्या आदेशानुसार सोडत कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार बुधवारी सकाळी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि महिला (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला आणि सर्वसाधारण महिलांसह) या प्रवर्गाकरिता आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यासाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले होते.

बारामती, लोणावळा, फुरसुंगी उरुळी देवाची, तळेगाव दाभाडे, दौंड, चाकण, जुन्नर, आळंदी, शिरूर, सासवड, जेजुरी, इंदापूर, राजगुरूनगर आणि भोर या १४ नगर परिषदा आणि वडगाव मावळ, मंचर आणि माळेगाव बुद्धक या तीन नगरपंचायतींसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.

यानुसार येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांना संबंधित नगर परिषद आणि नगरपंचायत कार्यालयामध्ये सूचना आणि हरकती नोंदविता येतील. या कालावधीत प्राप्त झालेल्या सूचना आणि हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांकडून सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे १७ ऑक्टोबरपर्यंत सुनावणीचा अहवाल सादर करण्यात येईल.

विभागीय आयुक्तांमार्फत २४ ऑक्टोबरपर्यंत प्रारूप आरक्षणावर हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम आरक्षणास मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर संबंधित मुख्याधिकाऱ्यांकडून येत्या २८ ऑक्टोबरपर्यंत अंतिम आरक्षण राज्य सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

इच्छुकांच्या चेहऱ्यावर आसू आणि हसू

बारामती/जेजुरी/शिरूर : जिल्ह्यातील नगर परिषदांच्या नगराध्यक्षपद आरक्षणानंतर बुधवारी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे या निवडणुकांंसाठी इच्छुकांंच्या चेहऱ्यावर ‘आसू आणि हसू’ असे संमिश्र भाव उमटले. अपेक्षेप्रमाणे प्रभाग आरक्षित झालेल्या इच्छुकांच्या चेहऱ्यावर हसू, तर आरक्षणामुळे दुसरा प्रभाग शोधण्याची वेळ आल्याने काही इच्छुकांमध्ये निराशा पसरली.

बारामतीत ४१ पैकी २१ जागी महिलांना संधी

बारामती नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४१ पैकी २१ जागी महिलांना संधी मिळणार आहे. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडतीनुसार सर्वसाधारण गटातील महिलांना ११, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ६, तर अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी चार जागा आरक्षित झाल्या. या नगर परिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी यापूर्वीच आरक्षित झाले आहे. या नगर परिषदेचे एकूण २० प्रभाग आहेत. त्यात १ ते १९ प्रभागांत प्रत्येकी दोन, तर क्रमांक २० च्या प्रभागात तीन जागा आहेत.

शिरूरमध्ये चुरशीची स्थिती

शिरूर नगरपरिषदेची नगरसेवक संख्या २१ वरून २४ झाली आहे. नगर परिषदेच्या रसिकलाल धारिवाल सभागृहात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. प्रांताधिकारी पूनम अहिरे, मुख्याधिकारी प्रीतम पाटील, कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ, पंकज काकड, चंद्रकांत पठारे, विनोद उबाळे आदी या वेळी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक १ हा सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २ ओबीसी महिला आाणि सर्वसाधारण.

प्रभाग क्रमांक ३ ओबीसी आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ४ अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ५ सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ६ ओबीसी महिला आणि सर्वसाधारण, प्रभाग क्र ७ ओबीसी आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ८ ओबीसी महिला आणि सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९ अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १० अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ११ अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण तसेच प्रभाग क्रमांक १२ ओबीसी आणि सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित झाला आहे.

सासवडमध्ये लक्षवेधी लढतीची शक्यता

सासवडमध्ये ११ प्रभागांतून २२ सदस्यांसाठी आरक्षण सोडत नगर परिषदेच्या सभागृहात काढण्यात आली. या वेळी पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे उपस्थित होत्या. या नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.

प्रभाग क्रमांक १ अ : ओबीसी महिला, १ ब : सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २ अ : ओबीसी महिला, २ ब : सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक अ : अनुसूचित जाती महिला, ३ ब : सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ४ अ : अनुसूचित जाती सर्वसाधारण, ४ ब : सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक ५ अ : सर्वसाधारण महिला, ५ ब : सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ६ अ : सर्वसाधारण महिला, ६ ब : सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक अ : सर्वसाधारण महिला, ७ ब : सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक ८ अ : ओबीसी सर्वसाधारण, ८ ब : सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ९ अ : ओबीसी सर्वसाधारण, ९ ब : सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १० अ : ओबीसी सर्वसाधारण, १० ब : सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ११ अ : ओबीसी महिला, ११ ब : सर्वसाधारण यासाठी आरक्षित झाला आहे.

जेजुरीत उत्सुकता

जेजुरी नगर परिषदेच्या १० प्रभागांमधून २० उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. यांपैकी महिलांसाठी १० जागा राखीव आहेत. नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहे. उपविभागीय अधिकारी सुरेखा माने यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक – १ अ – सर्वसाधारण महिला ,ब – सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक -२ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब -सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३ अ -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब -सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक -४ अ- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक -५ अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण) प्रभाग क्रमांक- ६ (अ -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ७ अ- अनुसूचित जाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक- ८ अ -नागरिकांचा मागास प्रवर्ग ,ब – सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ९ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १० अ -अनुसूचित जाती महिला, ब- सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे. जेजुरी नगर परिषदेवर माजी आमदार संजय जगताप यांचे वर्चस्व होते. काँग्रेसच्या ताब्यात नगरपालिका होती. मात्र, आता जगताप यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने नगरपालिकेवर पुन्हा त्यांची सत्ता येणार का, याबाबत उस्तुकता असणार आहे.