राज्यात थंडीच्या हंगामातील उकाडा; ढगाळ स्थिती , मोठ्या पावसाची शक्यता नाही|state of maharashtra summer is starting in the cold day there is no possibility for rain weather pune | Loksatta

राज्यात थंडीच्या हंगामातील उकाडा; मोठ्या पावसाची शक्यता नाही

विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंशांपर्यंत वाढ होऊन थंडी गायब झाली आहे.

राज्यात थंडीच्या हंगामातील उकाडा; मोठ्या पावसाची शक्यता नाही
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

पुणे : राज्याच्या बहुतांश भागात सध्या थंडीच्या हंगामात उकाड्याची स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंशांपर्यंत वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या दक्षिणेकडील वातावरणाचा परिणाम म्हणून पावसाळी स्थिती, ढगाळ वातावरण तयार झाले असले, तरी कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही.

राज्यात सध्या गेल्या आठवड्याच्या एकदम उलट वातावरण तयार झाले आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि निरभ्र आकाश, कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे २०, २१ नोव्हेंबरला राज्याच्या सर्वच भागांतील तापमानाचा पारा नीचांकी पातळीपर्यंत खाली येऊन थंडीचा कडाका वाढला होता. मात्र, बंगालचा उपसागर आणि त्यापाठोपाठ अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार झाली. परिणामी समुद्रातून बाष्प येऊ लागले. त्यातून दक्षिणेकडील राज्यांत पावसाळी वातावरण तयार होऊन केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांत आणि आजूबाजूच्या भागांत पाऊस झाला. त्यामुळे महाराष्ट्रात थंड वाऱ्यांचा प्रभाव घटला आणि कोकण, मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात ढगाळ वातावरण तयार होऊन तापमानात वाढ झाली.

हेही वाचा: पाठ्यपुस्तकात ‘२६/११’चा धडा घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील तापमानात सध्या सर्वाधिक वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमान पाच दिवसांपूर्वी ९ ते ११ अंशांवर आणि सरासरीच्या तुलनेत ५ ते ६ अंशांनी घटले होते. आता मात्र बहुतांश भागात सरासरीच्या तुलनेत ५ ते ७ अंशांनी किमान तापमानात वाढ होऊन ते १८ ते २१ अंशांवर गेले आहे. त्यामुळे थंडीऐवजी या भागात उकाडा जाणवत आहे. मुंबईसह कोकण विभागातही किमान तापमान २४ अंशांवर आणि सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी वाढले आहे. मराठवाड्यातील किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. केवळ विदर्भातच किमान तापमान अद्यापही सरासरीखाली असून, तेथे हलकी थंडी आहे. शनिवारी गोंदिया येथे राज्यातील नीचांकी १०.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 11:23 IST
Next Story
पाठ्यपुस्तकात ‘२६/११’चा धडा घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती