पुणे : राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उष्माघाताच्या धोक्यात वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत उष्माघाताच्या चार रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित आपत्कालीन उपचारांसाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात ८ मार्चपर्यंत उष्माघाताचे ४ रुग्ण आढळून आले असून, त्यात जालना जिल्ह्यात २, ठाणे १ आणि नांदेड १ अशी रुग्णसंख्या आहे. उन्हाळ्यामुळे तापमान वाढल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. उष्णता जास्त वाढल्याने उष्माघातासह आरोग्यविषयक इतर समस्या निर्माण होत आहेत. यामुळे उष्णतेपासून आपले संरक्षण करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे. आरोग्य विभागाने सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष उभारण्याची सूचना फेब्रुवारीमध्ये केली होती. त्यानुसार सर्व रुग्णालयांमध्ये आतापर्यंत हे कक्ष सुरू झाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.

उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, वृद्ध नागरिक, गर्भवती, स्तनदा माता, शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्ती, सहव्याधीग्रस्त अशांना होतो. त्यामुळे त्यांनी उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी. लहान मुले आणि वृद्धांना पुरेसे पाणी पिण्यास द्या. गर्भवतींनी उन्हात जाणे टाळावे आणि हलका आहार घ्यावा. उन्हात काम करणाऱ्यांनी अधूनमधून विश्रांती घ्यावी. जास्त घाम येत असेल तरी ओआरएस, साखर-मीठ पाणी किंवा ताक प्यावे. आजारी व्यक्तींना या काळात अधिक त्रास होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी आणि गरज भासल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य सहायक संचालक डॉ. प्रेमचंद कांबळे यांनी सांगितले.

काळजी काय घ्यावी?

  • गडद रंगाचे आणि जाड कपडे घालू नका.
  • दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे.
  • उन्हात शारीरिक कामे करणे टाळावे.
  • शीतपेये, सोडा अथवा अल्कोहोलयुक्त पेये टाळावीत.
  • हलका आहार घ्यावा.


सर्व जिल्हा आणि महापालिका स्तरांवरील साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्यांचे उष्माघात विषयक प्रशिक्षण घेण्यात आले आहे. त्यांच्या मार्फत आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणही झाले आहे. सर्व आरोग्य संस्थांना उष्णतेशी संबंधित आपत्कालीन समस्यांवर उपचाराच्या सूचना देण्यात आल्या आहेत. – डॉ. मयूरेश सासवडे, सल्लागार, वातावरणीय बदल.

उष्माघाताचा तडाखा

वर्ष – एकूण रुग्ण – मृत्यू

२०२३ – ३,१९१ – १४

२०२४ – ३४७ – १

२०२५ (८ मार्चपर्यंत) – ४ – ०

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The threat of heatstroke is increasing maharashtra government has initiated special measures ssb