मुंबईत सरासरी पावसाचे प्रमाण कमी; राज्यात मात्र यंदा सरासरी पाऊस ३१ टक्के अधिक; मुंबई शहरातील पाऊस नऊ टक्क्यांनी उणा

राज्यात ऑगस्टच्या पंधरवडय़ापर्यंत सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के अधिक पाऊस झाला असला, तरी सध्या कोकण विभागातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत कमी असल्याचे चित्र आहे.

मुंबईत सरासरी पावसाचे प्रमाण कमी; राज्यात मात्र यंदा सरासरी पाऊस ३१ टक्के अधिक; मुंबई शहरातील पाऊस नऊ टक्क्यांनी उणा
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : राज्यात ऑगस्टच्या पंधरवडय़ापर्यंत सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के अधिक पाऊस झाला असला, तरी सध्या कोकण विभागातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत कमी असल्याचे चित्र आहे. हंगामातील आजवरच्या सरासरीनुसार मुंबई शहरातील पाऊस ९ टक्क्यांनी उणा आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्हे पावसाची सरासरी कशीबशी पूर्ण करू शकले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्हाही पावसात उणा आहे.

यंदाच्या हंगामात जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र, जुलैमध्ये तिसऱ्या आठवडय़ापर्यंत झालेल्या जोरदार पावसाने जूनमधील पावसाची सरासरी भरून काढली. त्यामुळे राज्यातील एकूण पाऊस सरासरीच्या पुढे जाऊ शकला. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात आणि ऑगस्टच्या सुरुवातीच्या टप्प्यातही बहुतांश भागात पावसाची उघडीप होती.

कोकणातही सध्या कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी आहे आणि पावसाने सरासरीही पूर्ण केली आहे. मात्र, सरासरीच्या तुलनेत ९ टक्केच अधिक पाऊस कोकणात झाला आहे. मुंबई शहरात तर सरासरीच्या तुलनेत पाऊस नऊ टक्क्यांनी मागे पडला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतही पाऊस सरासरी ओलांडून फार पुढे जाऊ शकलेला नाही. मध्य महाराष्ट्रातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा ३२ टक्क्यांनी अधिक असून, केवळ सांगली या एकाच जिल्ह्यात पाऊस १३ टक्क्यांनी उणा आहे. विदर्भातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा ४५ टक्क्यांनी अधिक आहे. परंतु, या विभागातही अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा खूप पुढे जाऊ शकलेला नाही. मराठवाडय़ातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा ४६ टक्क्यांनी अधिक आहे. हिंगोली जिल्ह्यात मात्र सरासरीच्या तुलनेत मोठा पाऊस अद्यापही झालेला नाही.

पाऊसभान..

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कमी दाबाचे पट्टे आणि समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्याच्या अनेक भागांत पाऊस होतो आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला, तरी आठवडय़ात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काही भागांत मोठय़ा पावसाची नोंद झाली.

कुठे, किती?

मुंबईत सरासरीच्या तुलनेत पाऊस नऊ टक्क्यांनी मागे आहे. १ जून ते १६ ऑगस्टपर्यंत मुंबईत पावसाची सरासरी १५५७ मिलिमीटर आहे. मात्र, मुंबईत सध्या १४१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सांगलीतील ही सरासरी ३०९ मिलिमीटर असून, तेथे २६९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस नांदेड (८४ टक्के अधिक), नागपूर (७३ टक्के अधिक), वर्धा (७५ टक्के अधिक), नाशिक (६५ टक्के अधिक) या जिल्ह्यांमध्ये झाला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This year average rainfall amount rain average ysh

Next Story
कपडय़ांच्या किमतीत लवकरच वाढ?; कापड उद्योगावर कापूस तुटवडय़ाचे संकट; अतिवृष्टीने नुकसान, किडीचाही प्रादुर्भाव
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी