पुणे : विदर्भात आजपासून पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने विदर्भातील विविध जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागात कोरडे वातावरण आहे. एक द्रोणिका रेषा मराठवाडा ते कोमोरीनपर्यंत तयार झाली आहे. दुसरी द्रोणिका रेषा उत्तर ओदिशा ते पूर्व विदर्भापर्यंत आहे. त्यामुळे विदर्भाकडे बाष्पयुक्त वारे येऊन आद्रर्तेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रामुख्याने पूर्व विदर्भात पुढील तीन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.
यलो अलर्ट
शनिवार – नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा.
रविवार – अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा.
सोमवारी – वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया.