पुणे : दिवाळीत मार्केट यार्डातील भुसार बाजारात महिनाभरात ३०० कोटी रुपयांची उलाढाल झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत भुसार बाजारातील उलाढालीत ५० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षात ऑनलाइन पद्धतीने अन्नधान्य, तसेच अन्य जीवनावश्यक वस्तुंची खरेदी वाढली आहे. मात्र, मार्केट यार्डातील भुसार बाजारात जाऊन दिवाळीत प्रत्यक्ष खरेदी करण्यास किरकोळ ग्राहक, तसेच किराणा माल विक्रेते प्राधान्य देत आहेत. दिवाळी सुरू होण्यापूर्वी महिनाभर आधी मार्केट यार्डातील भुसार बाजराात खरेदीदारांची गर्दी होती. पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच जिल्ह्यातील खरेदीदारांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. धान्य, कडधान्य, तेलबिया, सुकामेवा, मसाल्यांची आवक वाढली.

दिवाळी फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी लागणारे आटा, रवा, बेसन, मैदा, पोहे, तूप, तेल आणि साखर अशा अन्नधान्याच्या मागणीतही मोठी वाढ झाली. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत मिठाईपेक्षा आरोग्यदायी सुकामेव्याची पाकिटे भेट देण्याकडे कल वाढला आहे. यंदा सुकामेव्याच्या दरात किलोमागे १०० ते १५० रुपयांनी घट झाल्याने दिवाळीत सुकामेवा खरेदीसाठी गर्दी झाली होती.

पारंपरिक व्यापाराला चालना

ऑनलाइन पद्धतीने दिवाळीत कपडे, गृहोपयोगी वस्तू, तसेच अगदी पणत्याही खरेदी केल्या जातात. दिवाळीत मार्केट यार्डातील भुसार बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. दिवाळीच्या काळात भुसार बाजारात ३०० कोटी रुपयांची उलाढाल झाली. ऑनलाइन खरेदीच्या काळात पारंपरिक व्यापाऱ्याला दिवाळीत चालना मिळाली, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

मार्केट यार्डातील भुसार बाजारात पुणे शहर, उपनगरे तसेच जिल्ह्यातून ग्राहक खरेदीसाठी येतात. भुसार बाजारातील उलाढालीत यंदा चांगली वाढ झाली. – डाॅ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

फराळासाठी लागणाऱ्या धान्य, मसाले, तेल, तुुपासह सुकामेव्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. ऑनलाइन खरेदीऐवजी ग्राहकांनी स्थानिक बाजारापेठेतून खरेदी केली. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे व्यापाऱ्याला चालना मिळाली. – राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर