शिरूर : गाडीच्या धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन भावांना करण्यात आलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. दुसरा भाऊ जखमी झाला आहे. शिरुरमधील कारेगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.सिध्दीकी मोहम्मद मुजम्मील मोहम्मद हाजी (वय ३३, मूळ रा. नांदेड, सध्या रा. यश इन चौक, कारेगाव, ता. शिरूर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ मोहम्मद शकील मोहम्मद हाजी हा जखमी झाला आहे. या प्रकरणी ओंकार वाळके आणि त्याचा साथीदार विजय जगधने (रा. दोघेही कारेगाव, ता. शिरूर) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील आणि सिध्दीकी हे दोघे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता पायी जात असताना त्यांना मोपेडवरून आलेल्या वाळके आणि जगधने यांच्या गाडीचा धक्का लागला. त्याचा जाब विचारल्याने आरोपींनी मनात राग धरला. यानंतर शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास आरोपी वाळके आणि जगधने यांनी शकील आणि सिध्दीकी यांच्या खोलीत घुसून; तसेच इमारतीच्या टेरेसवर दोघांना लाकडी दांडके, पाईपने मारहाण केली. त्यामध्ये सिध्दीकीचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर आरोपी फरार झाले होते.

पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, हवालवाद ब्रह्मा पोवार, अभिमान कोळेकर, विजय सरजिणे, पोलीस शिपाई योगेश गुड, गणेश वाय यांच्या पथकाने तपास सुरू केला. आरोपी कारेगाव-बाभुळसर गावच्या हद्दीत लपल्याचे समजले. पोलिसांनी दोघांना अटक केली. हाजी कुटुंब हे मूळचे नांदेड येथील आहे. ते पाच भाऊ असून, तीन भाऊ हे सात वर्षापासून रांजणगाव- कारेगाव एमआयडीसीतील खाजगी कंपनीत कामाला आहेत. तिघे कारेगाव येथे राहतात. तिसरा भाऊ हा कामानिमित्त कंपनीत गेला होता.