पुण्यातल्या कल्याणी नगर जंक्शन या ठिकाणी रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली. ज्यामध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर ज्या पोर्शे कारने या दोघांना धडक दिली त्या कारचा चालक १७ वर्षांचा म्हणजेच अल्पवयीन आहे. या प्रकरणी अनिशचा मित्र अकीबने दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच साडेसतरा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलगा हा पुण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. तो दारुच्या नशेत कार चालवत होता आणि त्याने दोघांना उडवलं ज्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसंच त्याला जामीनही देण्यात आला आहे. अशात एक महत्त्वाची माहिती समोर येते आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की या प्रकरणातला आरोपी अल्पवयनी आहे. भारतीय दंडसंहितेतील तरतुदीनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल केला आहे. तसंच त्याच्याविरोधात मोटार वाहन कायद्यातील ज्या कलमांचं उल्लंघन झालं आहे ती कलमंही लावण्यात आली आहेत. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील आणि ज्या बारने या मुलाला आणि त्याच्या मित्रांना मद्य दिलं त्यांच्याविरोधात कलम ७५ आणि ७७ अंतर्गत कारवाई केली जाते आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. कारचालक असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. अनिश आणि अश्विनी हे पार्टीसाठी गेले होते. ते दुचाकीवरुन परतत असताना या मुलाने त्यांना पोर्शे कारने धडक दिली. ज्यात या दोघांचा मृत्यू झाला.

हे पण वाचा- पुणे: पार्टी करून मध्यरात्री घरी निघालेल्या तरुण-तरुणीचा कारच्या धडकेत मृत्यू

१७ वर्षीय मुलाला कोर्टात करण्यात आलं हजर

दरम्यान पोलिसांनी १७ वर्षीय आरोपीला रविवारी दुपारी विशेष हॉलिडे कोर्टात हजर केलं होतं. पोलिसांनी त्याची रवानगी कोठडीत करण्यात यावी अशी मागणी केली. तसंच आरोपी साडेसतरा वर्षांचा आहे त्यामुळे त्याला प्रौढ समजून खटला चालवला जावा अशी मागणीही करण्यात आली. मात्र न्यायालयाने या आरोपीला जामीन मंजूर केला अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. बचाव पक्षाचे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितलं न्यायालयाने काही अटींवर त्यांच्या अशिलाला जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाने दिले निबंध लिहिण्याचे आदेश

आम्ही पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करणार आहोत असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. तसंच न्यायालयाने अल्पवयीन मुलाला कार अपघातावर निबंध लिहिण्यास सांगितलं आहे. अशीही माहिती देण्यात आली. पोर्शेने दुचाकीला टक्कर दिली आणि त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. पुण्यातल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपीने १५ दिवस येरवडा विभागात ट्राफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचं नियोजन करावं. अपघातावर त्यानं ३०० शब्दाचा निबंध लिहावा आणि मद्य सोडायला मदत होईल अशा डॉक्टरकडून उपचार घ्यावेत असं सांगितलंय. तसंच मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घेऊन त्यासंदर्भात अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगितलं आहे. अशीही माहिती पाटील यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two killed as car hits bike minor driver told to write essay on mishap by court scj