स्वारगेट आणि डेक्कन जिमखाना येथून हडपसर रेल्वे स्थानकापर्यंत पीएमपीकडून दोन नवे मार्ग प्रस्तावित करण्यात आले असून मंगळवारपासून (२२ नोव्हेंबर) या सेवेला सुरूवात होणार आहे. आठवड्यातील रविवार, मंगळ‌वार आणि शुक्रवार या दिवशी ही सेवा सध्या देण्यात येणार आहे. प्रवासी संख्या आणि उत्पन्नात वाढ झाल्यानंतर या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढविण्याचे नियोजित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वारगेट आणि डेक्कन येथून हडपसर रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी पीएमपीने सेवा द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर सेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीकडून जाहीर करण्यात आला.स्वारगेट येथून सुटणाऱ्या गाडीचा मार्ग गोळीबार मैदान, जुना पुलगेट, बाॅम्बे गॅरेज, लष्कर पोलीस स्थानक, क्राऊन रस्ता, घोरपडी पोस्टमार्गे हडपसर असा आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडच्या लघुउद्योजकांनी उद्योगमंत्र्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

डेक्कन येथून सुटणारी गाडी फर्ग्युसन महाविद्यालय, महापालिका, गाडीतळ, जुना बाजार, आंबेडकर पुतळा, साधू वासवानी चौक, रूबी हाॅल, ब्ल्यू डायमंड हाॅटेल, भैरोबा पंपिंग स्टेशनमार्गे हडपसरला जाणार आहे.या मार्गांमुळे प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित सेवा उपलब्ध होणार आहे. प्रवासी संख्या वाढल्यानंतर या मार्गावरील फेऱ्याही वाढविण्याचे नियोजित आहे. प्रवाशांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two new routes of pmpml to hadapsar railway station pune print news tmb 01