पुणे : विवाहाच्या आमिषाने वेगवेगळ्या घटनेत दोन युवतींवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कोंढवा आणि हडपसर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा पोलिसांनी विवाहाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. अनिकेत राकेश निकाळजे (वय २१, रा. एसआरए वसाहत, कमेला, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत युवतीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती अल्पवयीन आहे. आरोपी निकाळजे आणि युवतीची ओळख झाली होती. युवतीला विवाहाचे आमिष दाखवून त्याने जाळ्यात ओढले. त्यानंतर युवतीवर त्याने वेळोवेळी बलात्कार केला. युवतीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने युवतीला धमकावले. घाबरलेल्या युवतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.
विवाहाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार केल्याची आणखी एक घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने युवतीला विवाहाचे आमिष दाखविले होते. त्याने तिच्यावर बलात्कार केला. युवती गर्भवती झाली. तिने विवाहाबाबत त्याच्याकडे विचारणा केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. युवतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करत आहेत.
दरम्यान, विवाहाच्या आमिषाने एका महिलेवर बलात्कार केल्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रुपेश बाळू साळवे (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली. आरोपी साळवेने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले होते. विवाहाच्या आमिषाने त्याने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला. महिलेने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने नकार दिला. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.
विनयभंग प्रकरणात एकाविरुद्ध गुन्हा
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या घरात युवक शिरला. महिलेला धमकावून त्याने अश्लील कृत्य केले. महिलेने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत.
