पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा देऊन पुणे लोकसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करणारे वसंत मोरे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी त्यासाठी रदबदली करावी, यासाठी वसंत मोरे यांनी पवार यांची भेट घेतली. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र भेट झाली पण राजकीय चर्चा झाली नाही, असे पवार आणि वसंत मोरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसंत मोरे मनसेकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र त्यांच्या उमेदवारीबाबत प्रतिकूल अहवाल दिल्याने ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत मनसेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र पुणे मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपकडे आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी ते पक्षात जाणार की अपक्ष लढणार, याबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांनी गुरुवारी शरद पवार यांची पक्ष कार्यालयात भेट घेतली. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चाही या निमित्ताने सुरू झाली होती. मात्र काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास मोरे इच्छुक आहेत. त्यासंदर्भात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबरही त्यांची प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पवार यांनी त्यांच्यासाठी शब्द टाकावा, यासाठी ही भेट होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा – पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदार लंकेंचा पक्षप्रवेश टळला ?

हेही वाचा – प्रवाशांना खुशखबर! रेल्वे गाड्यांना किर्लोस्करवाडी, पारेवाडी स्थानकावर थांबा

दरम्यान, भेट झाली असली तरी राजकीय चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिले. मोरे यांनीही माध्यमांशी बोलताना राजकीय चर्चा झाली नाही, असे सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant more meet sharad pawar request for mediation to get nomination from congress pune print news apk 13 ssb