पुणे : ‘भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षात आणलेले लोक सोबर आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये आणलेली एक सभ्य व्यक्ती दाखवावी, असा परखड प्रश्न ज्येष्ठ विचारवंत डाॅ. विश्वंभर चौधरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात उपस्थित केला. दरम्यान, जेव्हा महाराष्ट्राचा नवीन सांस्कृतिक, राजकीय इतिहास लिहिला जाईल, तेव्हा फडणवीसांची नक्की नोंद होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

डाॅ. चौधरी म्हणाले, ‘गेल्या काही वर्षात राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले आहे. पूर्वी सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील नेते असो एकमकांबद्दल परस्पर भाव, सौहार्दाचे वातावरण आणि सांस्कृतिक राजकीय परंपरा असे होते. मात्र, सध्याचे राजकारण सुडाचे आणि कटशाहचे बनले आहे. ज्यांच्यावर आधी आरोप करून तुरुंगात टाकण्याची वल्गना केली जाते, त्याच ‘आदर्श’ लोकांना आज सत्तेत सामावून घेतले आहे. मांडीला मांडी लावून एकत्र बसले आहेत. ही राजकीय परिस्थिती अत्यंत कटू झाली आहे. थोडे वेगळे मत व्यक्त केले, की हेतुपुरस्सर वैयक्तिक-कौटुंबिक जीवनात अडचणी आणायच्या, चारित्र्यहनन करायचे, ईडी, सीबीआय या यंत्रणांची भीती दाखवून तुरुंगामध्ये टाकायचे या नवीन राजकीय परंपरेचा उदय झाला आहे.’

महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचे सांगत त्या्ंच्यामागे सक्तवसुली संचललनालय (ईडी) आणि केद्रीय अन्वेषण विभागाच्या चौकशीचा ससेमीरा लावला. त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. मात्र, इडीच्या न्यायालयात गेल्यानंतर के‌वळ एक कोटी रुपयांच्या घोटाळा झाल्याच्या संशयावर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. एवढ्यावरच हे थाबंले नाही, तर त्यांना तुरुंगातही प्रचंड यातना देण्यात आल्या, एवढी राजकीय, मानसिक पातळी सत्ताधाऱ्यांनी गाठली आहे, असे डाॅ. चौधरी यांनी सांगितले.

सत्ताधारी एवढी माणुसकी विसरले आहेत का? कोणी सत्तेचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाही. परंतु, उद्या तुम्ही विरोधी पक्षात बसल्यावर तुमची अशीच परिस्थिती केली जाईल. असे होऊ नये म्हणून या नवीन राजकीय संस्कृतीला वेळीच आवर घालणे आवश्यक असल्याचे आवाहनही डाॅ. चौधरी यांनी केले.

आणखी एक नवीन संस्कृती

सत्ताधारी पक्षातील एका नेत्याने सत्तेतील दुसऱ्या नेत्याचे प्रकरण काढायचे आणि आंदोलन करून पुन्हा शांत बसायचे. या नवीन संस्कृतीचा उदय झाला आहे, असे डाॅ. चौधरी यांनी सांगताना जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात सर्वाधिक टीका करणारे माजी आमदार रविंद्र धंगेकर हे सत्ताधारी शिवसेना (शिंदे) गटातील असून मित्र पक्ष भाजपच्या केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करायची, पुन्हा शांत बसायचे असेच नवीन संस्कृतीचे राजकारण सुरू आहे, असे डाॅ. चौधरी यांनी नमूद केले.