पुणे : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशभरातून भाविक तेथे दर्शनासाठी येऊ लागले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी देशभरातून रेल्वेने दोनशे आस्था विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. पुण्यातून अयोध्येसाठी १५ विशेष गाड्या ३० जानेवारीपासून सोडल्या जाणार आहेत. परंतु, अयोध्येतील गर्दीमुळे या गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आस्था गाड्यांचे सर्व डबे शयनयान श्रेणीचे असतील. प्रत्येक गाडीत सुमारे दीड हजार प्रवासी असणार आहेत. इंडियन रेल्वे केटरिंग टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) या गाड्या सोडणार आहे. या गाड्यांसाठी एकट्या प्रवाशाला तिकीट आरक्षित करता येणार नाही. प्रवाशांचा समूह असेल तरच तिकिट आरक्षित करता येईल. यासाठी किमान १५ प्रवाशांचा समूह आवश्यक आहे. या गाड्या ३० जानेवारी ते ३ मार्च या कालावधीत सोडण्याचे नियोजन असून, एकूण १५ गाड्या सोडल्या जाणार असून, त्या दर दोन दिवसांनी सोडल्या जातील.

आणखी वाचा-पंतप्रधानांचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम दाखवण्याची व्यवस्था करा, शिक्षण विभागाचा आदेश

देशभरातून अयोध्येसाठी आस्था विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. परंतु, अयोध्येतील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या गाड्यांचे वेळापत्रक काही दिवस पुढे ढकलण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. कारण या गाड्यांतून देशभरातील भाविक अयोध्येत पोहोचून गर्दी आणखी वाढणार आहे. यासाठी रेल्वेने या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गाड्यांमध्ये केवळ शाकाहारी जेवण

आस्था या गाड्यांमध्ये केवळ शाकाहारी जेवण दिले जाणार आहे. या गाड्यांच्या तिकिटावर आरक्षण शुल्क, सुपरफास्ट गाडी शुल्क, खानपान शुल्क, सेवा शुल्क आणि वस्तू व सेवा कर लावला जाणार आहे. याचबरोबर कोल्हापूर ते अयोध्या गाड्या सोडण्याचाही रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. पुण्यासह मुंबई, नागपूर, वर्धा, जालना येथूनही आस्था गाड्या सोडल्या जाणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to go to ayodhya from pune signs of waiting for direct trains pune print news stj 05 mrj