पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकडे आगामी महापालिका निवडणुकीची ‘लिटमस टेस्ट’ म्हणून बघितले जात आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये १३ प्रभाग असून ५२ नगरसेवक निवडून येतात. प्रभागात उमेदवाराला मिळणारी मते महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देताना महत्वाची ठरणार आहेत. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस दोनही पक्षांकडून याचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीतील प्रभागनिहाय मतदान चिंचवडमधील महापालिका इच्छुकांचे राजकीय भवितव्य ठरवेल, असे दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने घेण्यात आलेल्या चिंचवड विधानसभेसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. गुरुवारी मतमोजणी होणार आहे. भाजपाकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह २८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. चिंचवडमधील पाच लाख ६८ हजार ९५४ मतदारांपैकी दोन लाख ८७ हजार ४७९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला.

हेही वाचा – महावितरणच्या रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड; ग्रामीण भागातील ४२ रोहित्रांची तोडफोड

महापालिकेतील सत्ताकाळात भाजपाने चिंचवडमधील अनेकांना पदे देताना डावलले. त्यामुळे चिंचवडमधील भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी होती. या नाराजीतून काही जणांनी पक्षांतर केले. तर, काही जणांनी पक्षात राहून पोटनिवडणुकीत विरोधकांना छुप्या पद्धतीने मदत केल्याची चर्चा चिंचवडच्या वर्तुळात आहे. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिंचवड मतदारसंघात महापालिकेचे १३ प्रभाग येतात. एका प्रभागातून चार, असे ५२ नगरसेवक पालिकेवर निवडून जातात.

महापालिकेतील सत्तेचा सोपानमार्ग चिंचवडमधून जातो. त्यामुळेच महापालिका निवडणुकीपूर्वी झालेली ही पोटनिवडणूक भाजपा, राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली. महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपाने तर पुन्हा सत्तेचा मार्ग मोकळा व्हावा याकरिता जोर लावला. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी पाहून भाजपा, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनीही प्रचारात हिरिरीने सहभाग घेतला.

हेही वाचा – एक लिंबू पाच रुपयांना; उन्हाळ्याची चाहूल, लिंबांच्या मागणीत वाढ

प्रभागात आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत-जास्त मतदान होण्यासाठी काही माजी नगरसेवकांनी प्रयत्न केले. तर, काहींनी छुप्या पद्धतीने विरोधी उमेदवाराचे काम केले असल्याची राजकीय वतुर्ळात कुजबूज सुरू आहे. प्रभागात ज्या पक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक मतदान असेल, त्या पक्षाच्या माजी नगरसेवकाला आगामी पालिका निवडणुकीचे तिकीट मिळण्यास अडचण येणार नाही. मात्र, कमी मतदान पडलेल्या माजी नगरसेवकाला मात्र तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार यात शंका नाही.

हेही वाचा – कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होणार; व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची यादृच्छिक तपासणी

प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वाधिक मतदान

चिंचवडमधील प्रभाग क्रमांक १७ चिंचवडेनगर, चिंचवडगाव, प्रेमलोक पार्क, भोईरनगर, वाल्हेकरवाडीमध्ये सर्वाधिक २८ हजार ४८४, प्रभाग क्रमांक २७ तापकीरनगर, रहाटणी, श्रीनगर, काळेवाडीत २८ हजार ३७०, प्रभाग क्रमांक १६ रावेत, किवळे, मामुर्डीत २६ हजार ३७, प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख, वाकड, वेणूनगर, कस्पटेवस्ती, विशालनगरमध्ये २५ हजार ७९, प्रभाग क्रमांक २९ पिंपळेगुरव, सुदर्शनगरमध्ये २३ हजार ३६१ मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मते कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पडतात यावर विजयाची गणिते अवलंबून असतील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ward wise voting in chinchwad byelection will decide the fate of municipal election aspirants pune print news ggy 03 ssb