scorecardresearch

एक लिंबू पाच रुपयांना; उन्हाळ्याची चाहूल, लिंबांच्या मागणीत वाढ

किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एका लिंबाची विक्री तीन ते पाच रुपयांना केली जात आहे.

lemons rate increase pune
एक लिंबू पाच रुपयांना; उन्हाळ्याची चाहूल, लिंबांच्या मागणीत वाढ (image source – pixabay)

पुणे : उन्हाळ्याची चाहूल लागल्याने लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. सरबत विक्रेते, तसेच रसवंतीगृह चालकांकडून लिंबांच्या मागणीत वाढ झाली असून, घाऊक आणि किरकोळ बाजारात लिंबांच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एका लिंबाची विक्री तीन ते पाच रुपयांना केली जात आहे.

बाजारात लिंबांची आवक कमी होत आहे. मागणीच्या तुलनेत लिंबांचा तुटवडा जाणवत असून, रसवंतीगृहचालक आणि सरबत विक्रेत्यांकडून लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. गुलटेकडीतील बाजार आवारात लिंबांची आवक कमी प्रमाणावर होत असून, गेल्या दहा दिवसांत घाऊक बाजारात लिंबाच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील लिंबू व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.

हेही वाचा – राज्यात दहावीची परीक्षा उद्यापासून; विद्यार्थी संख्येत घट

किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री प्रतवारीनुसार तीन ते पाच रुपयांना केली जात आहे. मार्केट यार्डातील बाजारात सध्या दररोज दीड हजार गोणी लिंबांची आवक होत आहे. दहा दिवसांपूर्वी लिंबांच्या दोन ते तीन हजार गोणींची आवक होत होती. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि सोलापूर जिल्ह्यातून लिंबांची बाजारात आवक होत आहे. प्रतवारीनुसार लिंबांच्या गोणीला ४०० ते १४०० रुपये असा दर मिळाला आहे, असे जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा – महावितरणच्या रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड; ग्रामीण भागातील ४२ रोहित्रांची तोडफोड

दहा दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात दहा रुपयांना पाच लिंबे मिळायची. उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांच्या मागणीत वाढ झाली असून, सध्या किरकोळ बाजारात एका लिंबाला प्रतवारीनुसार तीन ते पाच रुपये असा दर मिळत आहे. येत्या काही दिवसांत लिंबांच्या मागणी आणि दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महिनाभरापूर्वी लिंबांना दर मिळत नव्हते. ज्या शेतकऱ्यांनी लिंबे राखून ठेवली आहेत, त्यांना आता चांगले दर मिळणार आहेत, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील लिंबू व्यापारी रोहन जाधव म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 13:25 IST