पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त फुलेवाड्यात अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावर भाष्य केले.

महायुतीमध्ये काही जागांवरून तिढा कायम आहे. त्यात सातारा आणि नाशिक या जागांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. या दोन्ही जागांबाबत अजित पवार म्हणाले, की सातारा आणि नाशिकचे सगळे व्यवस्थित होईल. त्याबाबत काळजी करू नका. ती निवडणूक पुढच्या टप्प्यात आहे. त्याचे अर्ज भरण्यास अजून सुरुवात झालेली नाही. नाशिक किंवा कोकण येथील निवडणुकीचे अर्ज शेवटच्या टप्प्यात भरले जाणार आहेत. महाराष्ट्रातील पाचवा टप्पा हा शेवटचा टप्पा आहे. देशातील सातवा टप्पा शेवटचा आहे. त्यामुळे त्याला अजून विलंब आहे. आम्ही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य मार्ग काढू.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीमुळे ‘पीएसआय’च्या शारीरिक चाचणी लांबणीवर; एमपीएससीचा निर्णय

हेही वाचा – पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ

राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत अजित पवार यांनी त्यांचे मत मांडले. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशभरातील काम पाहिलं आहे. त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. महायुतीला याचा नक्कीच फायदा होईल. राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे आहे, असे पवार म्हणाले.