पुणे : बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटणारे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत पुरंदरचे प्रश्न सोडविण्याचे आणि पुरंदरला निधी देण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे शिवतारे माघार घेणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, ते यासंदर्भातील भूमिका लवकरच जाहीर करणार आहेत.

बारामती कोणाचा सातबारा नाही, असे सांगत विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावरही त्यांनी कडवट टीका केली होती. त्यामुळे शिवतारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिली होती. मात्र कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन १ एप्रिल रोजी जाहीर सभा आणि १२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे शिवतारे यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या कृतीचे महायुतीमध्येही तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तसचे शिवतारे करत असलेल्या आरोपांवर अजित पवार यांनी बोलणे टाळले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबबाबत भूमिका घेतली, त्यांना समजावून सांगतिल, असे पवार यांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा : पुण्यात काँग्रेसला स्वकियांचाच धोका, केंद्रीय पथक दाखल

या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री स्वतंत्र बैठक झाली. त्यामध्ये शिवतारे यांनी उपस्थित केलेले मुद्दे, प्रश्न समजावून घेण्यात आले. पुरंदरच्या विकासासाठी निधी देण्याचे आश्वासनही शिवतारे यांना देण्यात आले. ही भूमिका शिवतारे यांनाही मान्य झाल्याने त्यांनी माघार घेण्याची तयारी दर्शविल्याची चर्चा आहे. यासंदर्भात शिवतारे लवकरच भूमिका जाहीर करणार आहेत.