पुणे : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) विद्यमान आमदार बापू पठारे यांनी त्यांना झालेल्या मारहाणीनंतर हा प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप रविवारी पत्रकार परिषदेत केला. ‘लोहगाव परिसरातील जलवाहिन्यांची आणि सांडपाणी वाहिन्यांची कामे अर्धवट असल्याने रस्ते करण्याची घाई करू नका, असे सांगितल्याचा राग आल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी बंडू खांदवे यांनी मारहाण केल्याचा आरोप पठारे यांनी केला.
बापू पठारे यांना एका कार्यक्रमात मारहाण झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री पुढे आला होता. या प्रकारानंतर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर पठारे रविवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी हा आरोप केला. माजी नगरसेवक महेंद्र पठारे, सुरेंद्र पठारे आणि राजेंद्र खांदवे यावेळी उपस्थित होते.
‘जलवाहिनी आणि सांडपाणी वाहिन्यांची कामे अर्धवट असल्याने रस्ता करण्याची घाई करू नका, असे मी सांगितल्यानेच मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. गाडीचालक आणि सुरक्षा कर्मचाऱ्याने मध्यस्थी केल्यानंतर खांदवे आणि त्यांच्या समर्थकांनी या दोघांनाही मारहाण केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खांदवे यांच्याकडून राजकीय स्टंटबाजी करत आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्रव्यवहार करून खांदवे यांच्यावर कडक कारवाईची मागणी करणार आहे,’ असे पठारे यांनी स्पष्ट केले.
‘लोहगावातील रस्त्याला निधी मंजूर होऊनही रस्त्यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे बंडू खांदवे रविवारी जनआक्रोश आंदोलन करणार होते. लोहगावमध्ये शनिवारी रात्री एका कार्यक्रमासाठी आमदार बापू पठारे आले होते. कार्यक्रमात खांदवे समोर आले. त्या वेळी आंदोलनावरून खांदवे यांनी माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली. मी स्टेजवर गेल्यावर खांदवे आणि त्यांच्या जमावाने माझ्या चालकाला मारहाण केली,’ असे पठारे यांनी सांगितले. ‘मारहाणीची माहिती समजल्यानंतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने लोहगावात आले. मात्र, आम्ही कुठलाही हिंसाचार केला नाही. कायदा हातात घेतला नाही,’ असे पठारे यांनी सांगितले.
पठारे पुण्यातील महाविकास आघाडीचे एकमेव आमदार आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) तिकिटावर ते गेल्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी आमदार सुनील टिंगरे यांना पराभूत केले होते. पठारे २०१९च्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लगला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) प्रवेश केला होता.