पुणे : येरवडा परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बिंदू माधव ठाकरे चौकात उड्डाणपूलाबरोबरच ग्रेड सेपरटेर उभारण्यात येणार असून त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया महापालिक प्रसानसाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होण्याची शक्यता असून या परिसरातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. यासाठी एकशे पंधरा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये रस्ते रुंदीकरणासह महत्त्वाच्या चौकांवर फ्लायओव्हर आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचा समावेश आहे. त्याअंतर्गत येरवडा परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बिंदू माधव ठाकरे चौकात फ्लायओव्हरबरोबर ग्रेड सेपरेटर उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रकल्प विभागाने घेतला आहे.

बिंदू माधव ठाकरे चौकातून संगमवाडी, खडकी, बंडगार्डन पूल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी कडे जाता येते. या भागात सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. संगमवाडी येथे खासगी बसस्थानक असल्याने येथेून गाड्यांची येथे नियमित वाहतूक असते.

खडकीहून बंडगार्डनकडे जाणाऱ्या रस्त्यावर फ्लायओव्हर उभारला जाणार आहे. हा फ्लायओव्हर दोन मार्गिकांचा असणार आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना २-२ मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध असतील. या उड्डाणपुलाची लांबी ९०० मीटर लांबी तर रुंदी १५.६० मीटर एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून देण्यात आली.

संगमवाडी बाजूने डॉ. आंबेडकर चौक आणि बंडगार्डनकडे जाणारा वाय आकाराचा ग्रेड सेपरेटर प्रस्तावित आहे. संगमवाडीहून डॉ. आंबेडकर चौकाकडे जाणारा ग्रेडसेपरेटर ५५० मीटर लांबीचा तर बंडगार्डनकडे जाणारा भाग ४४० मीटर लांबीचा असेल. संगमवाडी बाजूचा ग्रेड सेपरेटर ९ मीटर रुंद व ३ मार्गिकांचा असणार आहे. तसेच डॉ. आंबेडकर चौक आणि बंडगार्डनकडे जाणारा भाग ७.५ मीटर रुंद प्रत्येकी दोन-दोन मार्गिकांचा असणार आहे.

एकशे पंधरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

या फ्लायओव्हर व ग्रेड सेपरेटर प्रकल्पाची अंदाजित किंमत ११५ कोटी ७३ लाख रुपये आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ३० महिने म्हणजेच सुमारे अडीच वर्षांचा कालावधी ठेवण्यात आला आहे.