पुणे – गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी पुणे शहरातील येरवडा येथील श्री सद्गुरू सयाजीनाथ माळी महाराज गणपती विसर्जन घाटावर सोयी-सुविधांसाठी महापालिकेने लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र, नागरिकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. याउलट, गैरहजर असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला हजेरी वहीत हजर दाखवण्यात आले. या प्रकाराविरोधात शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्या नेतृत्वाखाली विसर्जन घाटावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

याबाबत बोलताना आनंद गोयल म्हणाले, “येरवडा येथील श्री सद्गुरू सयाजीनाथ माळी महाराज गणपती विसर्जन घाटावर महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना कोणतीही सुविधा दिली जात नाही. याबद्दल सहायक आयुक्तांना जाब विचारण्यासाठी गेलो असता, तेथे कर्मचारी उपस्थित नव्हते. हजेरी पुस्तकात एका गैरहजर महिलेच्या नावासमोर हजर असल्याचे दाखवले होते, पण प्रत्यक्षात ती महिला कामावर नव्हती.”

गोयल यांनी पुढे सांगितले की, “सुविधा दिल्या जात नसतानाही या कामासाठी ५ लाख ९२ हजार ९५० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी नेमका कुठे गेला, याची चौकशी झाली पाहिजे. तसेच, घाटावर काही कर्मचारी गणवेशात नसतात, तर काही मद्यपान करून येतात. जेव्हा आम्ही या गोष्टींचा जाब विचारला, तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते आणि त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे,” असे त्यांनी महापालिका आयुक्तांकडे सांगितले.