पिंपरी : ‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोसरी येथे झालेल्या जाहीर सभेत ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’चा नारा दिला ‘बटे थे तब कटे थे, अब बटेंगे नही. एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या भावनेतून आपल्याला कार्य करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारत निर्माण झाला असून, ‘सबका साथ, सबका विकास’ सुरू आहे. काेणामध्ये भेदभाव नसल्याचे सांगत त्यांनी एकीकरणाचे आवाहन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ गावजत्रा मैदानावर जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>काँग्रेस आघाडी ‘समस्या’; तर भाजपा महायुती ‘समाधान’ – योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ म्हणाले की, भारताचा पाया हा सनातन आहे आणि सनातनवर प्रहार हा महाविनाशाला आमंत्रण आहे. ‘बटे थे तब कटे थे, अब बटेंगे नहीं…एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या भावनेतून आपल्याला कार्य करायचे आहे. देशात काँगेसचे सरकार असताना पाकिस्तान भारतात घुसखाेरी करत हाेता. वारंवार घुसखाेरी हाेत हाेती, आतंकवादी हल्ले हाेत हाेते. आतंकवादी कारवायांना काँग्रेसने राेखले नाही. या मुद्द्यावर आवाज उठवू नका, कारण संबंध खराब हाेतील, असे आम्हाला सांगत होते. काँग्रेस देशाच्या किमतीवर पाकिस्तानशी संबंध सुधारत हाेती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात ‘हम छेडेंगे नहीं लेकिन हमें छेडेंगे तो छोडेगे नहीं’ असा संदेश जगभरात गेला आहे. देशाच्या समस्येचे कारण काँग्रेस आघाडी आहे, तर समस्यांवरील समाधान महायुती आहे.

हेही वाचा >>>“शरद पवारांना हिंदू म्हणायची लाज वाटत असेल तर त्यांनी सांगावं ते हिंदू नाहीत”, किरीट सोमय्यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारत निर्माण झाला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ सुरू आहे. सगळ्यांना सुरक्षा आणि काेणामध्येही भेदभाव नाही. भारताला जाेडणारी ताकद महायुतीत आहे, तर महाआघाडी ही महाअनाडी आहे. या महाअनाडीकडे नीती, नियत आणि निर्णय घेण्याचे सामर्थ्य नाही. परिवाराचा विकास एवढाच यांचा नारा आहे. केवळ काँग्रेसच्या खानदानी परिवाराचा विकास सुरू आहे. अशी टीका याेगी आदित्यनाथ यांनी केली.

विशाळगडावर अतिक्रमण हटविण्यास गेल्यानंतर दगडफेक केली जाते. गडावर अतिक्रमण का झाले, अयाेध्या, काशी, मथुरा, १९४७ मध्ये लाखाे हिंदूंची हत्या का झाली, गणेश विसर्जन मिरवणूक, रामनवमी शाेभा यात्रेवर दगडफेक का होत होती, कारण आपण विभागलाे हाेताे. भारताचा पाया सनातन आहे आणि सनातनवर प्रहार हा महाविनाशाला आमंत्रण आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेसने देशहिताचा कधी विचार केला नाही. काँग्रेसला सत्तेची लालसा नसती, तर देशाची फाळणी झाली नसती. निर्दाेष लाखाे हिंदूंची हत्याही झाली नसती. काँग्रेसने फाळणी करून देशाच्या हिताला तिलांजली दिली. स्वातंत्र्यानंतर जाती, क्षेत्र, भाषेच्या आधारे देशाची विभागणी करण्याचे काम काँग्रेसने केले, असे आरोप याेगी आदित्यनाथ यांनी केले. भारताची ताकद वाढल्यास पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल. त्यानंतर बलुचिस्तानसह पाकिस्तानचे इतर भाग देशात येतील, असा दावाही त्यांनी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogi adityanath who made the statement batenge to katenge now has a different slogan pune print news ggy 03 amy