दिल्लीवाला
सत्ताधाऱ्यांना जेरीला आणायला लोकसभेत विरोधकांमध्ये सध्या आक्रमक नेता उरलेला नाही. त्या तुलनेत सगळा गोंधळ राज्यसभेत बघायला मिळतो. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून राज्यसभेत प्रचंड गदारोळ सुरू आहे. बुधवारी कधी नव्हे ते राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तास चालवला गेला. बहुधा, सदनाचं कामकाज झालेलं दाखवण्यासाठी प्रश्नोत्तरं घेतली गेली असावीत. या गोंधळात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार मोठंच्या मोठं उत्तर देत होत्या. त्यांचं म्हणणं कोणाला ऐकू गेलं ते माहीत नाही, ते कामकाजाचा भाग झालं इतकंच. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतानाही किरकोळ प्रश्नांवर त्यांनी राज्यमंत्री भागवत कराड यांना बोलू दिलं. त्यांचंही म्हणणं विरोधकांना ऐकू गेलं नाही. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयासंदर्भातील प्रश्नही सूचीमध्ये होते. तीन-चार प्रश्नांची उत्तरे देऊन ते निघून गेले. गडकरी सदनात आले तेव्हा विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांचे सदस्य अवघ्या सभागृहाला वेठीस धरतात. गडकरी उत्तर देत असतानाही काँग्रेसचे सदस्य पहिल्या रांगेत खरगे यांच्या आसनाजवळ येऊन मोदींविरोधात घोषणा देत होते.
तेवढय़ात तृणमूलचे गटनेते डेरेक ओब्रायन काँग्रेस सदस्यांच्या आसनाकडं गेले. तिथे त्यांचं खरगे, जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला आदी काही सदस्यांशी बोलणं झालं. ते सुरू असताना काँग्रेसची घोषणाबाजी पूर्ण थांबली आणि अचानक सभागृहात शांतता पसरली. नेमकं काय झालं हे सत्ताधाऱ्यांनाही कळलं नाही. गडकरींचं उत्तर देणं सुरूच होतं. ओब्रायन आणि रमेश यांच्यामध्ये बोलणं होत असताना तृणमूल काँग्रेसच्या सुष्मिता देव यांनी ‘मोदी सदन में आओ’ अशी घोषणाबाजी केली. ओब्रायन यांनी देव यांना घोषणाबाजी करू नका, असं हाताने इशारा करून सांगितलं. मग, सभागृहातील विरोधकांची घोषणाबाजी पूर्ण बंद झाली. ओब्रायन गडकरींना उद्देशून म्हणाले, गडकरीजी, तुम्ही बोला!.. ओब्रायन यांच्या विधानावरून असं दिसलं की गडकरींसारखे काही निवडक मंत्री सभागृहात बोलत असताना घोषणाबाजी करून अडथळे आणायचे नाहीत असं विरोधकांनी ठरवलं असावं. पण, हे निवडक मंत्री गडकरींखेरीज अन्य कोणी नसावं. पण लोकसभेत मात्र गडकरी उत्तर देत असताना विरोधक फलक घेऊन कॅमेऱ्यासमोर उभे राहात होते. त्यामुळे राज्यसभेतील सदस्यांनी त्यांचा निर्णय लोकसभेतील सहकाऱ्यांना का सांगितला नाही हा प्रश्नच आहे.
हृदय डाव्या बाजूला
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलू दिलं जात नाही, त्यांच्यासमोरील माइक बंद केला जातो, असं काँग्रेसच्या सदस्यांचं म्हणणं होतं. सभापती जगदीश धनखड यांचं म्हणणं होतं की, माजी पंतप्रधान सभागृहाचे सदस्य आहेत, इथे तीन-चार सदस्यांबद्दल कमालीचा आदर आहे. खरगेंबद्दल तर हृदयात विशेष स्थान आहे! धनखड यांचं म्हणणं खरगेंनी ऐकून घेतलं आणि ते म्हणाले की, तुमचं मन मोठं आहे, मला माहिती आहे पण, ते सत्ताधाऱ्यांसाठी असतं.. त्यावर, सभापती म्हणाले, हृदय तर डाव्या बाजूला असतं. तुम्हीही डाव्या बाजूला बसता.. मोठय़ा मनामध्ये विरोधकांनाही स्थान आहे, असं सभापतींना सांगायचं होतं. पण, खरगे म्हणाले, हृदय डाव्या बाजूला आहे म्हणून कदाचित तुम्ही सातत्याने वळून वळून सत्ताधाऱ्यांकडं बघता. त्यामुळं तुमचं हृदय सत्ताधाऱ्यांना अधिक सामावून घेतं.. सभापती अगदी हसून सगळय़ांचं म्हणणं ऐकून घेतात, सत्ताधाऱ्यांनाच नव्हे विरोधकांमधील नेत्यांकडे आदराने पाहात असल्याचं, मार्गदर्शन करत असल्याचं सांगतात! सभापतींनी खरगेंना बोलण्यास सांगितलं तरी, काँग्रेसचे सदस्य खरगेंच्या मागं उभं राहून घोषणा देत होते. सभापतींनी खरगे आणि गोयल या दोघांनाही आपापल्या बाजूच्या सदस्यांना शांत राहण्यास सांगावं अशी सूचना केली. पण, गोंधळ इतका वाढला की, खरगेंचा माइक पुन्हा बंद झाला आणि सभापतींनी नेत्यांची विधाने इतिवृत्तांतामध्ये समाविष्ट न करण्याची सूचना केली. माझ्या पक्षाचे सदस्य माझ्यामागं उभं राहणार नाहीत तर काय मोदींच्या मागं उभं राहतील, असा प्रश्न करून खरगेंनी सगळय़ांनाच निरुत्तर केलं होतं. खरगेंच्या या विधानावरून सत्ताधारी सदस्यांनी उसळी घेतली आणि ते ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा देऊ लागले, त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी ‘इंडिया-इंडिया’ची घोषणाबाजी केली. अखेर खरगे आणि गोयल या दोघांशीही सभापतींना दालनात चर्चा करावी लागली.
..पण निलंबन नको
राज्यसभेत कुठल्याही मंत्र्याला विरोधक बोलू देत नव्हते. आलटूनपालटून लयीत घोषणा देत होते. ‘आप’चे संजय सिंह घोषणा देण्यात अग्रेसर असत, त्यांना निलंबित केलं गेलं. त्यानंतर विरोधक शहाणे झाले. त्यांच्यापैकी कोणीही सभापतींच्या समोरील मोकळय़ा जागेत येऊन घोषणाबाजी करत नाही. घोषणा द्यायच्या पण, निलंबित व्हायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. संजय सिंह सभागृहात नसल्याने घोषणाबाजीचं नेतृत्व करायला काँग्रेसचे शक्तिसिंह गोहिल पुढे आले. मग, बॅटन कधी रणदीप सुरजेवाला, कधी नासीर हुसेन, कधी इम्रान प्रतापगढी यांच्याकडे जात असे. अधूनमधून द्रमुकचे सदस्य तमिळमधून घोषणा देत. मग, तृणमूलचे खास सदस्य डोला सेन, सुष्मिता देव पुढे येत. त्यामध्ये पहिल्याच दिवशी तृणमूल काँग्रेसचे नवनियुक्त खासदार साकेत गोखलेही सहभागी झाले. डेरेक ओब्रायन यांनी गोखलेंना घोषणेचं नेतृत्व करायला सांगताच ‘मणिपूर-मणिपूर’च्या घोषणा सुरू झाल्या होत्या.
