‘उष्मा उसळला; कान झाका!’ हा अग्रलेख वाचला. मोठय़ा मूल्यांच्या नोटांच्या स्वरूपात प्रचंड प्रमाणात काळा पैसा साठवला जातो, असे कारण सांगत २०१६ मध्ये निश्चलनीकरणाची क्रांतिकारी घोषणा करण्यात आली होती. त्या वेळी नोटा जाळल्याचे फोटो पाहिले होते, नोटाबंदीमुळे काश्मीरमधील विघटनवादी चळवळीचे कंबरडे मोडल्याचेही ऐकले होते. मात्र देशांतर्गत निवडणूक प्रक्रिया शुद्ध करण्यासाठी आणलेल्या निवडणूक रोखे योजनेला वळसा घालून दोन मोठे उद्योगसमूह राहुल गांधी यांस टेम्पो भरभरून चोरीचा माल देत असल्याचे वाचून धक्का बसला.

निवडणूक हंगामातील भाजपचे स्टार प्रचारक आणि देशाचा सांविधानिक नेता या नरेंद्र मोदींच्या दोन भूमिकांतील द्वैत अनेक प्रश्नांना जन्म देते. ‘नोटाबंदी-२०१६’ हा प्रयोग काळे पैसे हुडकण्यात अपयशी ठरला का? काळय़ा पैशाने व्यापलेल्या अर्थव्यवस्थेचा प्रांत आक्रसवण्यासाठी करण्यात आलेला डिजिटायझेशनचा प्रयोगही फोल ठरला का? २०१६मध्ये मनमोहन सिंग, तसेच अनेक तज्ज्ञांनी वाजवी प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हा उद्देश आणि परिणामांची प्रांजळ चर्चा करण्याऐवजी स्वप्निल आणि अवास्तव युक्तिवाद केले गेले. नोटाबंदीनंतर अनुमानित ८० टक्के रकमेच्या तुलनेत तब्बल ९९ टक्के रक्कम बँकांत जमा झाली. २००० रुपयांच्या नोटांच्या रूपात सुरू केलेला तात्पुरता बायपास बंद व्हायलादेखील तब्बल सात वर्षे लोटली.

सर्वात विरोधाभासी वास्तव म्हणजे आज वापरात असलेल्या नोटांचे मूल्य ३५ लाख कोटी रुपये म्हणजेच नोटाबंदीच्या वेळेच्या मूल्याच्या दुप्पट झाले आहे. दुसऱ्या बाजूने बलाढय़ अर्थव्यवस्थेच्या शाश्वत उद्दिष्टपूर्तीसाठी सत्ता नावाचे साधन अपरिहार्य असल्यामुळे ईडीग्रस्त लोकप्रतिनिधींनी

साठविलेल्या काळय़ा पैशाला सरकारी तिजोरीत जमा होण्यापासून निवडणूकपूर्व आपद्धर्मीय सूट/ मुदतवाढ देण्यात आली आहे. निवडणूक जिंकायच्या तिरीमिरीने का असेना नोटाबंदीच्या प्रणेत्याच्याच तोंडून अर्थव्यवस्थेत काळा पैसा अजूनही आहे असे ऐकायला मिळणे म्हणजेच त्यांच्याच एका साहसी, अव्यवहारिक निर्णयाची उद्दिष्टपूर्ती पार फसली याची अप्रत्यक्ष कबुली आहे. आणि हीच देशभर सुखेनैव टेम्पोभ्रमण करणाऱ्या काळय़ा पैशाची सावळी बाजू आहे. –  सत्यवान भाऊ पाटील, नाळे (नालासोपारा)

तर, भाजपला कोलीत मिळाले नसते

‘उष्मा उसळला; कान झाका!’ हा अग्रलेख (१० मे ) वाचला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नको ते मुद्दे चर्चेत आले. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळसूत्र, हिंदू- मुस्लीम असे मुद्दे उपस्थित केले. मोदी आणि राहुल गांधी दोघेही एकमेकांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. राहुल गांधी गेली पाच वर्षे अदानी-अंबानी यांच्यावर सतत टीका करीत आहेत. मोदी सरकारने या दोन उद्योगपतींशी हातमिळवणी केल्याची टीका ते करतात. त्यांनी अगदी संसदेतसुद्धा हा मुद्दा मांडला. मोदींचे अदानी यांच्याबरोबर असलेले फोटो राहुल गांधींनी संसदेत दाखविले होते. तरीही मोदींनी तेलंगणा येथे प्रचारसभेत राहुल गांधींनी अलीकडे अदानी- अंबानींचे नाव घेणे बंद केल्याची टीका केली. त्यांना काळय़ा धनाचे टेम्पो पोहोचले का, असा प्रश्न केला.

प्रश्न असा आहे की अदानी- अंबानी काँग्रेसला पैसा का देतील? सरकार तुमचे आहे, ईडी, सीबीआयमार्फत चौकशी करा, सडेतोड उत्तर राहुल गांधींनी दिले. पंतप्रधान मोदी कसलाही विधिनिषेध न बाळगता विरोधकांवर विखारी टीका करतात. त्यामागे निश्चित असा हेतू असतो. दुसरीकडे काँग्रेसचे सॅम पित्रोदा यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्ये केली. भारतातील पूर्वेकडील नागरिक आणि दक्षिणेकडील नागरिक यांच्या दिसण्यावरून त्यांनी जी वक्तव्ये केली, ती आता करणे गरजेचे नव्हतेच. यापूर्वीही त्यांनी वारसाहक्कावरून विधान केले होते. काँग्रेसने त्यांचा राजीनामा घेतला, पण तो पूर्वीच घ्यायला हवा होता. जेणेकरून भाजपला आयते कोलीत मिळाले नसते.-  सुनील कुवरे, शिवडी (मुंबई)

मोदी आताच विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत?

निवडणुकीच्या तापलेल्या रणात पंतप्रधान मोदी हे एकटेच भाजपचे वन मॅन आर्मी होऊन इंडिया आघाडीला टक्कर देत असल्याचे चित्र दिसते. त्यांनी अंबानी-अदानींकडून काँग्रेसला टेम्पो भरून पैसे पोहोचल्याचा केलेला आरोप पाहता; त्यांची दमछाक झाल्याचे दिसते. तीन टप्प्यांतील मतदानाचा कल पाहता, हार मानून ते आताच विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत गेल्याचे प्रकर्षांने जाणवते. जनतेच्या मूलभूत प्रश्नांऐवजी काँग्रेस व इंडिया आघाडीतील नेत्यांच्या कोणत्याही वक्तव्याचा पराचा कावळा करून भावनिक खेळ खेळण्याचा आनंद घेतला जात आहे. हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर संशय घेतला तर त्याचा संबंध थेट पाकिस्तानशी जोडला जात आहे.

पित्रोदा यांनी शास्त्रीय दृष्टीने बरोबर असलेली वक्तव्ये केली. ती भारताला न मानवणारी असतीलही; त्यावरही नको तेवढी झोड उठवली गेली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली सेना म्हणता म्हणता, आता बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्रालाच नकली संतान म्हणण्यापर्यंत मजल पोहोचली. आता १०-१५ वर्षांपूर्वीची लोकसंख्यावढीची आकडेवारी जाहीर करून हिंदू-मुस्लीम वाद प्रखर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. विजय हा मोदींच्या हातचा मळ असल्याप्रमाणे ही पूर्ण निवडणूक मोदींभोवतीच सीमित ठेवण्याचा अट्टहास अंगलट येत असल्याचे दिसू लागल्याने आपली जागतिक प्रतिमा आणि प्रतिष्ठा विसरून मोदी बेभान होऊन काहीही बोलत आहेत, हे दिसते. त्यांना कोणीतरी सांगायला हवे, की ते अजूनही पंतप्रधान आहेत. हिंदू-मुसलमान, भारत- पाकिस्तान, हिंदू राष्ट्र या भावनिक मुद्दय़ांमध्ये आता कोणालाही अजिबात रस राहिलेला नाही. त्यांना मूलभूत प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. -किशोर बाजीराव थोरात, नाशिक

पक्षाच्या अस्तित्वाची चिंता का वाटेल?

‘अस्तित्वाविषयीच्या चिंतेतून विलीनीकरणाचे वक्तव्य’ हे पत्र (लोकसत्ता- १० मे) वाचले. शरद पवार यांनी अस्तित्वाविषयीच्या चिंतेतून विलीनीकरणाचे वक्तव्य केले, असे म्हणणे चुकीचे आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेत्यांची फौज असताना त्यांना त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाची चिंता का वाटावी? शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामागे खरे तर देशाच्या व्यापक हिताचा विचार आहे. काँग्रेस विरोधकांनी याबाबत केलेली टीका टिप्पणी त्यांच्या अंतरातील भयाची निदर्शक आहे! काँग्रेस केवळ एक राजकीय पक्ष किंवा संघटन नसून तो एक विचार आहे! हा विचार देशाला तारणारा आहे. आज काँग्रेस अपघाताने सत्तेपासून दूर असली तरी तीच या देशाची तारणहार आहे! देशाचे पालकत्व काँग्रेसकडेच आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विलीनीकरणाचे वक्तव्य निश्चितच देशाच्या व्यापक हिताचे आहे. -श्रीकांत मा. जाधव, अतीत (जि. सातारा)

सत्तापदे उपभोगूनही कृतघ्नपणा!

‘शरद पवारांचा मुलगा असतो, तर मला संधी मिळाली असती,’ या अजित पवारांच्या विधानाची बातमी (लोकसत्ता- ९ मे) वाचली. हे वक्तव्य हा कृतघ्नपणाचा कळस आहे. पाच वेळा उपमुख्यमंत्रीपद, त्याआधी विविध मंत्रिपदे अजित पवारांना मिळाली. मिळालेल्या संधींचा फायदा करून घेण्याऐवजी त्यांनी घोटाळेच अधिक केल्याचे दिसते- सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा, साखर कारखाना घोटाळा इत्यादी. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या असूनही त्यांना अद्याप एकही मंत्रीपद मिळालेले नाही. त्यांनीही याबद्दल कधी तक्रार केल्याचे ऐकिवात/ वाचनात नाही. अजित पवार सत्तेविषयी अतीआग्रही असल्याचा समज त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे अधिक बळकट होतो. -शशिकांत मुजुमदार, नवी पेठ (पुणे)

सहानुभूती बाळगणाऱ्यांतही उभी फूट

‘ठाकरे गटाबद्दल आता सहानुभूती शिल्लक नाही!’ ही बातमी (लोकसत्ता – ९ मे) वाचली. ठाकरे गट काय किंवा शरद पवार गट काय, यांच्याबाबत सहानुभूती बाळगणारे ठरावीक लोकच आहेत. त्यातही आता उभी फूट पडली असून बहुसंख्य लोक त्यांना सोडून गेल्याचे चित्र आहे. ‘नेते गेले, मतदार आहे तिथेच आहेत’ असे जरी शरद पवार म्हणत असले तरी, त्याचा प्रत्यय यायचा आहे. आतापर्यंत खरी सहानुभूती फक्त राजीव गांधींच्या वाटेला आली आहे. उद्धव ठाकरे काय किंवा शरद पवार काय, यांना जे काही मिळवायचे आहे, ते स्वकष्ट व स्वप्रतिमेवरच मिळवावे लागणार आहे. -अरविंद शं. करंदीकर, तळेगाव दाभाडे