काय अंजलीताई तुम्ही? अहो, शिक्षण आणि सत्ता याचा काही संबंध तरी उरला आहे काय? मग कशाला त्या दादांचे शिक्षण काढता? त्यांचा नवा भ्रष्टाचार तुम्हाला सापडत नाही की शोधून शोधून तुम्ही दमल्या आहात? काय समजायचे काय आम्ही. अहो, वसंतदादासुद्धा फार शिकलेले नव्हते, पण चालवलेच की त्यांनी राज्य योग्य पद्धतीने. अनेक राजे अशिक्षित होते, पण त्यांचा कारभार सर्वोत्कृष्ट. आता वर्तमानाचेच म्हणाल तर तुमचे विरोधक आतापासूनच बोलू लागलेत. त्या विश्वगुरूंच्या पदवीविषयी केव्हा प्रश्न विचारता म्हणून? कशाला नसती अडचण वाढवता. त्या पुण्याच्या सुषमाताई तर टपूनच बसल्या आहेत. तुम्ही बैलबंडी भरेल इतकी कागदपत्रे घेऊन दादांवर आरोप केले. काय झाले पुढे त्याचे? कधी विचारले का सत्तेला? ताई, किमान एखादे तरी प्रकरण तडीस न्या हो! भ्रष्टाचार मुक्तीसाठी आसुसलेले नागरिक नेमक्या याच क्षणाची वाट बघत आहेत. रोज नवी प्रकरणे काढून त्यांच्या डोक्यात उगीच गर्दी कशाला करता?

नाही शिकलेत आमचे दादा जास्त, पण एकेक पैचा हिशेब ठेवत राज्याची तिजोरी सांभाळत आहेतच की ते अनेक वर्षांपासून. त्यांच्या तिजोरीवर दरोडा पडलाय असे आले का कधी कानावर? नाही ना! मग शिक्षणाचा मुद्दा नाहक काढताच कशाला? त्या नागपूरच्याच नितीनभौविरुद्ध तुम्ही रोज एक पत्रकार परिषद घेणार होतात. धडाक्यात प्रारंभ करून तुम्ही अचानक थांबलात का, असे आता तुमचेच विरोधक विचारू लागलेत. तुमचे हितशत्रू म्हणतात, तुम्हाला थांबवले गेले. कोणी, कुठे, कसे यावर तुम्ही कधी बोलाल की नाही? तुम्ही आरोप करून प्रश्न विचारता व तुम्हाला कुणी प्रश्न विचारले तर कानाडोळा करता हे योग्य कसे ते तुम्ही सांगून टाका एकदा ताई.

आता तुम्ही त्या एकनाथरावांसारख्या ‘भल्या माणसा’च्या मागे लागलात. तुम्हाला सरकारमधले दादा व नाथाच कसे दिसतात हो? इतर सारे सज्जन व पापभिरू आहेत असे वाटते की काय तुम्हाला? असेल तर एकदा त्या सर्वांनी चांगले काम केले वा करताहेत अशी कौतुक करणारीही पत्रपरिषद घ्या की कधी. तेवढाच बदल! भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या मेहनतीबद्दल काही वादच नाही ताई. प्रकरणे शोधून काढण्याचा तुमचा वेग अगदी ‘वंदे भारत’सारखाच! तुम्ही प्रकरणे शोधत नाही तर ती तुम्हाला पुरवली जातात असे विरोधक भलेही म्हणोत, त्याकडे तुम्ही लक्ष देण्याची काहीएक गरज नाही. तुमच्याविषयी आदर असलेल्या अनेकांची अपेक्षा एवढीच की किती प्रकरणे तुम्ही तडीस नेलीत. त्यावरही कधीतरी बोला ताई. प्रकरणे तडीस जात नसतील तर त्याविषयीची तुमच्याकडची कंटेनर भरून असलेली कागदपत्रे निदान माहितीच्या अधिकारात तरी खुली करा. घरातूनच या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली याचे निदान समाधान तरी तुम्हाला मिळेल आणि तुमच्यावर कायम फेकल्या जाणाऱ्या ‘सिलेक्टिव्हली’ या शब्दरूपी बाणाचा वेगही थोडा कमी होईल. आणि हो, ते आरोपांची राळ उडू देताना अचूक ‘टायमिंग’ साधण्याचे तेवढे बघाल. घरातील व्यक्ती सरकारला सल्ला देण्यासाठी जात असेल तर थोडा काळ जाऊ द्या व मगच भ्रष्टाचार उघड करण्याची तारीख ठरवा. विरोधक इतके विसरभोळे नाहीत, हे लक्षात असू द्या. तर मग आता कधी करता घोषणा? ‘सरकारमधील सर्वांत मोठ्या पक्षाचा भ्रष्टाचार आज जाहीर करणार’ अशी!