‘गुप्ततेची अट पाळण्याच्या शपथेवर ऐनवेळी बोलावलेल्या या बैठकीसाठी जमलेल्या सर्व आमदार मित्रांनो, येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घरफोड्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. या टोळीचे सूत्रधार कोण हे तुम्हाला ठाऊक आहेच, त्यामुळे मी त्यांचे नाव घेण्याच्या भानगडीत पडत नाही. लोकसभेत आपल्या खऱ्या व मूळ पक्षाची कामगिरी चांगली नव्हती. त्यामुळे तुमच्यातील धाकधूक वाढली. नेमका त्याचाच फायदा घेत हे फोडण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. त्याला सामोरे कसे जायचे यासाठी आपण येथे जमलो आहोत. मी अगदी लहानपणापासून या घरफोड्या बघत आलो. तेव्हा काका अतिशय चतुराईने हे करायचे. आमदाररूपी ऐवज लुटून आणायचे. त्याचा राजकीय फायदा व्हायचा पण ज्याचे घर फुटले त्याच्या दु:खाची कल्पना यायची नाही. मग वेळ अशी आली की माझ्यावरच हे काम पार पाडण्याची पाळी आली. मला तर हे सारेच ठाऊक या उत्साहात मी पक्षही पळवला व घरही फोडले. मात्र हे करताना जी राजकीय चतुराई लागते ती मी काकांकडून शिकून घेऊ शकलो नाही. त्यामुळे राजकीय फायदा होण्याऐवजी तोटाच पदरात पडला.
घर फोडल्याचा राग कसा घालवायचा हे मला ठाऊक नसल्यानेच हे घडले. त्यानंतर मी भाषा बदलली. मी चूक केली, असे वाक्य प्रत्येक ठिकाणी म्हणत गेलो. सध्या माझा ‘माफीचा मोसम’ सुरू आहे. परतीचे दोर कापले गेल्याने जनतेचा राग शांत करण्यासाठी हाच एकमेव उपाय माझ्याकडे शिल्लक होता. त्यामुळे आता तुमचे घर फोडले गेले तर कुणावरही दोष न ढकलता माझीच चूक, माफी मागतो असे म्हणत राहा. यातील नम्रपणा फोडाफोडीची तीव्रता कमी करतो यावर आता माझा ठाम विश्वास बसला आहे. तुम्हीच आमिषाला बळी पडून या घराबाहेर गेलात तरी जिंकल्यावर परत याल याची खात्री असल्यानेच मी स्पष्टपणे बोलतो आहे. कसलाही त्रागा न करता एकाच घरात अनेक पक्ष कसे गुण्यागोविंदाने नांदू शकतात हे समजावून सांगण्यासाठी मी खास नाथाभाऊंना निमंत्रित केले. याची वाच्यता कुठेही होऊ नये म्हणून बैठकीचे स्वरूप गुप्त ठेवले. तेव्हा आता ते मंचावर येऊन मार्गदर्शन करतील’ असे म्हणून दादा थांबले.
हेही वाचा : लोकमानस : ‘सल्ला’ आणि ‘निर्देश’
भाऊ म्हणाले, ‘माझ्या घरात पाच वर्षांपासून भाजप व राष्ट्रवादी एकत्र नांदताहेत. सून एकीकडे तर मी व मुलगी दुसरीकडे असे असूनही कधीच वाद झाला नाही. त्यामुळे बाहेर वाच्यता होण्याचा प्रश्न उद्भवला नाही. वेगवेगळ्या पक्षांत राहून जनतेच्या सुख-समृद्धीसाठी झटताना कुटुंबाची सुख-समृद्धी कशी होईल हे आम्ही एकत्र येऊन ठरवल्याने पक्षीय वादाचे सारे मुद्देच निकाली निघाले. तुम्हाला घरफोडीचा सामना करावा लागलाच तर आता मी त्याचे तोंड पाहणार नाही अशी भाषा न वापरता हे सूत्र वापरा. यातून सुदृढ लोकशाहीचे दर्शन होते. आम्ही प्रत्येकाचे मतस्वातंत्र्य जपतो अशीही मल्लिनाथी करता येते. फक्त मी हा सल्ला तुम्हाला दिला हे थोरल्या साहेबांना सांगू नका’ असे म्हणत नाथाभाऊ थांबले. मग दादा शेवटी म्हणाले, ‘मी व भाऊंनी सांगितलेल्या या उपाययोजना तात्काळ अमलात आणा. बघा, घरफोडीचा राज्यात पसरलेला प्रभाव कसा आटोक्यात येतो ते!’ हे ऐकताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या.