नैतिक बधिरता येण्यासाठी पराकोटीची भक्तिसाधना लागते. ती केलेल्या नवनैतिकतावाद्यांनी कुस्तीगिरांच्या आरोपांवर ‘पुरावा काय’ विचारले, हा मुद्दा योग्यच..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेले कित्येक दिवस आंदोलन करणारे भारतीय महिला-पुरुष कुस्तीगीर अमेरिकादी देशांचे आभार मानतील. कारण या दौऱ्यामुळे भारतीय संस्कृतीचे गुणगान करणाऱ्या केंद्र सरकारास या संस्कृतीतील स्त्री-दाक्षिण्याची जाणीव झाली. राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गेले काही महिने आंदोलन करणाऱ्या महिला आंदोलनाची दखल या सरकारने त्यामुळे घेतली. उन्हातान्हात, थंडीवाऱ्यात गेले कित्येक दिवस दिवसरात्र धरणे धरून असलेल्या आंदोलकांस गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी चर्चेस बोलावून घेतले आणि त्यामुळे दोन दिवसांनी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनाही या मंडळींशी बोलावे लागले. अर्थात केंद्र सरकारला या मुद्दय़ावर सामोपचाराची भूमिका घ्यावी असे वाटले म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मनात आंदोलन करणाऱ्या भगिनींबाबत करुणभाव उत्पन्न झाला वा त्यांच्यातील सुप्त नैतिकता जागी झाली असे अजिबात नाही. कित्येक आठवडे या आंदोलकांकडे ढुंकून पाहणेही टाळल्यानंतर आणि जणू सर्व काही सुरळीत सुरू आहे असे वागल्यानंतर अचानक केंद्र सरकारला या मंडळींस चर्चेस बोलवावे लागले याचे कारण देशात नाही. ते परदेशात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अवघ्या काही दिवसांत दिग्विजयी विश्व दौऱ्यासाठी प्रस्थान ठेवतील. या दौऱ्यात संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात, अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या संयुक्त अधिवेशनात आणि त्याहूनही मुख्य न्यू यॉर्क येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयातून आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळय़ात विश्वातील समग्र मानवजातीस मार्गदर्शन करताना देशातील महिला आंदोलकांची पनवती नको या एकमेव कारणाने केंद्र सरकारास या आंदोलकांची भुणभुण बंद करण्याची गरज वाटली. हे आंदोलन तसेच सुरू राहिले आणि जागतिक माध्यमे त्यास असाच पाठिंबा देत राहिली तर पंतप्रधानांच्या आनंददौऱ्यात मिठाचा खडा पडण्याचा धोका होता. तो टाळण्यासाठी आता हा प्रयत्न. याचाच दुसरा अर्थ असा की हा दौरा नसता तर सत्ताधाऱ्यांचे या आंदोलनाकडे काणाडोळा करणे असेच सुरू राहिले असते. हे सत्य एकदा स्वीकारल्यानंतर हे सिंह महाशय, त्यांचा आश्रयदाता भाजप आणि या सर्वाचे समर्थक यांचा समाचार घ्यायला हवा.

 इतरांस नैतिकतेचे पाठ दिवसरात्र पढवणारा भाजप एका सर्वार्थी बाहुबलीस पाठीशी घालण्यासाठी कोणत्या थरास जाऊ शकतो हे जसे यातून दिसले तसेच या पक्षाचे समर्थकही नैतिकतेबाबत किती निवडक निर्ढावलेले आहेत याचेही या काळात दर्शन झाले. उत्तर प्रदेशातील साठेक शैक्षणिक संस्था, १०-१५ विधानसभा मतदारसंघ, तीन-चार लोकसभा मतदारसंघ यावर पकड असेल तर अशा व्यक्तीची चाल, चारित्र्य कसे दुय्यम ठरते हेदेखील या काळात भाजपने दाखवून दिले. स्वत:च्या मालकीची दोन दोन हेलिकॉप्टर्स या सिंहाकडे आहेत म्हणे. पक्षविस्तारास त्याचा उपयोग होत असावा. ब्रिजभूषण शरण सिंह याच्या नावावर नाही, असा गुन्हा शोधण्यासाठी कष्ट करावे लागतील. या इसमास याच भाजपने एके काळी पक्षातून काढले होते. पण सद्य:स्थितीत पक्षाकडे चारित्र्य धुलाई यंत्र असल्याने कोणतेही काळे, रक्ताळलेले डाग धुऊन काढण्याची सोय आहे. त्यामुळेच चारित्र्यसंपन्न, नैतिकतावादी असा हा पक्ष कोणत्याही गावगुंडास चारित्र्यसंपन्न करू शकतो. परिणामी स्वकष्टाने वर आलेल्या, पुरुषी संस्कृतीवर मात करून विजयी ठरलेल्या महिला कुस्तीगिरांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करण्याची मिजास हा पक्ष दाखवू शकला. तसेही महिला कुस्तीगीर, महिला पैलवान हा काही प्रभावी मतदारसंघ नाही. आणि या पैलवानांनी काही कौतुकास्पद कामगिरी केलीच तर त्यांना भेटीस बोलून, त्यांच्यासमवेत छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमांत फिरवण्याची सोय देशातील सर्वोच्च सत्ताधीशांस आहेच. त्यासाठी त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्याची काय गरज? आणि अशा पैलवान महिला असतात किती? मूठभरच. आणि पैलवान नसलेल्या महिलांस ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘नारी तू नारायणी’ वगैरे चटकदार घोषणांद्वारे आकृष्ट करता येते, असा विचार सत्ताधाऱ्यांनी केला नसेलच असे नाही. पण सिंह यांचे तसे नाही. राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या जातीचे ते प्रतिनिधित्व करतात. असतील त्यांच्यावर गंभीर आरोप, पण आगामी निवडणुकांत सिंह यांची उपयुक्तता जास्त आहे. तेव्हा महिला पैलवानांपेक्षा बाहुबलीस पाठीशी घालण्याची गरज सत्ताधाऱ्यांस वाटणे सद्य:स्थितीत साहजिक म्हणायचे. आता मुद्दा या पक्षाच्या समर्थकांचा.

 त्यांस आंधळे समर्थक, अंधभक्त म्हणणे हा अंधत्वाचा अपमान. प्रज्ञाचक्षु वा संवेदन-जागृतीमुळे अंधांतही काही प्रमाणात डोळसता असते. ब्रिजभूषण शरण सिंहाच्या मुद्दय़ावर सरकारची पाठराखण करणाऱ्यांची अवस्था त्यापेक्षा किती तरी गंभीर म्हणायची. सत्ताधाऱ्यांच्या दुर्गंधीसही अवीट परिमल मानून त्या सुवासात आध्यात्मिक आनंद शोधण्याची या मंडळींची वृत्ती पारमार्थिकांस कळणारी नाही. ही अशी नैतिक बधिरता येण्यासाठी पराकोटीची भक्तिसाधना लागते. ती केलेली असल्याने या नवनैतिकतावाद्यांनी कुस्तीगिरांच्या आरोपांवर ‘पुरावा काय’ असा प्रश्न विचारण्याचे धाडस केले. हा मुद्दा योग्यच. उगाच कोणत्याही महिलेने उठावे, कोणाही सत्पुरुषावर आरोप करावा आणि त्याची लगेच दखल कल्याणकारी राज्यकर्त्यांनी घ्यावी अशी अपेक्षा बाळगणेच मुळात चूक. या विचारानेच सरकारने या महिला कुस्तीगिरांच्या आरोपांकडे दुर्लक्ष केले. पण या पुराव्याच्या युक्तिवादात एक बारीकशी फट दिसते. ती अशी की महिलांनी पुरुषांविरोधात लैंगिक गैरव्यवहाराच्या आरोपांच्या सिद्धतेसाठी पुरावा असणे हे या मंडळींच्या मते इतके आवश्यक होते/आहे तर मग प्रश्न असा की परराष्ट्र राज्यमंत्रीपदी असलेले एम जे अकबर यांस मंत्रिमंडळातून काढले गेले ते का? या अकबर यांच्याविरोधात त्यांच्या काही महिला सहकाऱ्यांनी असाच लैंगिक दुष्कृत्यांचा आरोप केला होता. तो काळ ‘मी टू’ चळवळीचा. त्या वेळी वातावरण फारच विरोधी जाते आहे हे दिसल्यावर याच पंतप्रधान मोदी यांनी अकबर यांस नारळ दिला. ते तर खरे तर मोदी यांचे मंत्री. त्या तुलनेत ब्रिजभूषण शरण सिंह एक साधे खासदार. पण मंत्र्यांसाठी एक नैतिक निकष आणि साध्या खासदारांसाठी दुसरे; असे काही आहे काय? की ज्यांच्यावर तडकाफडकी कारवाई केली ते ‘अकबर’ होते आणि ज्यांच्यावर कारवाई करणे टाळले जाते ते ब्रिजभूषण शरण सिंह आहेत म्हणून दोन न्याय? खरे तर हे ब्रिजभूषण शरण सिंह हे सरकार ज्यांस शिरसावंद्य मानते त्या मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या अयोध्येतील मंदिराचे सक्रिय कारसेवक. आपल्या पत्नीवर साध्या एका परिटाने संशय घेतला म्हणून तीस अग्निपरीक्षा घ्यायला लावणाऱ्या कोदंडधारी रामाच्या या सक्रिय सेवकावर थेट लैंगिक दुष्कृत्याइतके गंभीर आरोप असतील तर उलट त्यास अधिक कडक शासन व्हायला हवे. पण प्रभू रामचंद्राच्या पाईकांची उलटी तऱ्हा. ब्रिजभूषण शरण सिंहावर कारवाई राहिली दूर. उलट सर्व प्रयत्न त्यास कसे वाचवता येईल, याचेच. पण त्या प्रयत्नांस पंतप्रधानांच्या विदेशवारीने तात्पुरती खीळ बसली. आता १५ जूनपर्यंत ब्रिजभूषण शरण सिंहावर गुन्हा दाखल करणे, नव्याने कुस्तीगीर परिषदेची निवडणूक, तीत या सिंहास दूर ठेवणे इत्यादी आश्वासनेही देण्यात आल्याचे दिसते. ती पाळली जातील, असे मानण्यास जागा आहे. त्यामागील कारण पंतप्रधानांचे एकापाठोपाठ दौरे लागलेले आहेत हे जसे आहे, तसेच या सिंहास अधिक वाचवल्यास राजकीय नुकसानीची शक्यता; हेदेखील आहे. हे आहे म्हणून या कुस्तीगिरांस न्याय मिळण्याची शक्यता तरी आहे. अन्यथा ‘नेता व्हावा ऐसा गुंडा’ हे आपले सत्य आहेच.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on protesting wrestlers meeting with home minister amit shah zws