अमेरिकेच्या शहराशहरांत ट्रम्प यांचा निषेध हजारोंच्या उपस्थितीत होऊ लागलेला आहे; त्यात अमेरिकावासी भारतीय सध्या तरी मोठ्या प्रमाणावर दिसत नाहीत…

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जाहीर विधाने आणि पूर्वी रेकॉर्ड अडकण्याचे व्हायचे तसे प्रकार यांत विलक्षण साम्य दिसते. भारताने यापुढे रशियाकडून तेल खरेदी न करण्याचे निर्णय घेतल्याचे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केले. यातून हे साम्य पुन्हा समोर येते. याआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आपण थांबविले हे विधान त्यांनी आतापर्यंत ३५ वेळा वा अधिक प्रसंगी केल्याचे आढळेल. त्यात तुलनेत भारत-रशिया तेल खरेदीबाबतचे विधान तूर्त तीन वेळाच झालेले आहे. पण हे तीनही प्रसंग दोन दिवसांतील आहेत. सर्वसाधारण कोणी इसम असता तर दोन दिवसांत तीन वेळा म्हणजे दोन महिन्यांत किती वेळा असे काही त्रैराशिक मांडताही आले असते. पण ट्रम्प यांच्याबाबत तीही सोय नाही. गडी कोणत्याच समीकरणात बसत नाही. आता तर ते नुसते रशियाचे तेल भारत खरेदी करणार नाही, इतकेच म्हणून थांबत नाहीत. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणास तसे दूरध्वनीवरील संभाषणात सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण यास ना पंतप्रधान मोदी दुजोरा देतात ना सरकार असे काही घडल्याचे नाकारते. म्हणजे आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत होकार नाही याचा अर्थ नकार असेलच असे नाही असे ज्याप्रमाणे मानले जाते त्याप्रमाणे याही प्रकरणी ट्रम्प संवाद झाल्याचे अद्याप नाकारण्यात आलेले नाही म्हणून तो तसा झाला असेही मानण्याचे कारण नाही. तो झाला असेलही. वा नसेलही. आपण रशियाकडून तेल खरेदी सुरूही ठेवू शकतो. किंवा ती थांबवूदेखील शकतो. प्रश्न तेलाचा नाही. तर ट्रम्प यांचे करायचे तरी काय; हा आहे.

या ट्रम्प यांचे पुन्हा नव्याने व्हाइट हाऊसात नसणे हे आपणासाठी खोळंबा असेल असे आपले आपणास सुरुवातीस वाटले. त्यातूनच ‘अगली बार…’ ची हाळी गेल्या वेळी दिली गेली. पण तेव्हा ती फळली नाही. त्या हाकेस आता प्रतिसाद मिळाला आणि खरोखरच ते आले. त्यामुळे आपणास आणि अमेरिकेतील ‘आपल्यांस’ कोण आनंद झाला. विश्वाच्या प्रगतीचा सूर्य आता पूर्वेकडील भारतात उगवणार आणि पश्चिमेच्या अमेरिकेत मावळणार असेच जणू सर्वांस वाटू लागले. अमेरिकेतील अनेक भारतीयांस तर इतका हर्षवायू झाला की तो वायू शरीरांत मावेना. तो मुक्त झाल्याने अमेरिकेच्या किनाऱ्यावर वादळे आली. तथापि ट्रम्प यांनी या सगळ्यावर आपल्या वर्तनाने पाणी ओतले. त्यामुळे भारतातील अमेरिकावाद्यांचा जसा हिरमोड झाला त्यापेक्षा अधिक दु:ख ‘ग्रीनकार्ड’धारी असूनही भगवा जीव की प्राण मानणाऱ्यांचा झाला. अनेकांनी तर ‘हेचि फल काय मम तपाला’ असे म्हणत कपाळास हात लावला, असे म्हणतात. ट्रम्प सत्तेवर यावेत यासाठी भारतीयांनी काय नाही केले? अनुष्ठाने केली, जपजाप्य केले, रिपब्लिकनांना निधी दिला, आअमेरिकी (आसेतुच्या धर्तीवर) हिंदूंचे मेळावे घेतले. या सगळ्याचा परिणाम होऊन ते सत्तेवर आलेही. पण घास भरवणाऱ्या हाताचाच चावा घेण्याचा उच्च दर्जाचा कृतघ्नपणा त्यांनी दाखवला आणि भारतालाच वरचेवर अडचणीत आणणे सुरू केले. आयात शुल्क म्हणू नका, पाकिस्तानची तळी उचलणे म्हणू नका, भारताची बदनामी म्हणू नका… ! ट्रम्प यांनी आपला जमेल तितका अवमानच केला. आपण काही चीन वा ब्राझीलसारखे उद्धट नाही. चांगले संस्कार झालेले आहेत आपल्यावर. त्यामुळे या अपमानामुळे अंगाला भोके तर नाही ना पडत… असा विचार करत, आपल्या निसर्गदत्त सहिष्णुतेचे प्रदर्शन करत आपण ट्रम्प यांच्या वर्तनाकडे दुर्लक्ष केले. आपण लोकशाहीची जननी. म्हणजे माता. म्हणजेच मूर्तिमंत क्षमाशीलता. तिचाच आविष्कार या दुर्लक्षातून दिसतो. पण यातून काही धडा घेतील तर ते ट्रम्प कसले. त्यांची टकळी आपली सुरूच. भारत-पाकिस्तान युद्ध आपण थांबवल्याची (असत्य) दर्पोक्ती त्यांनी किती करावी? ती संपायच्या आत आता हा रशियन तेल खरेदी भारत थांबवणार असल्याचा ते देत असलेला निर्वाळा. त्याकडे आपल्या नेतृत्वाने दुर्लक्ष केले ते योग्यच. खातेऱ्यात दगड टाकला की घाणीचे शिंतोडे आपल्यावरच उडतात, हे लक्षात घेऊन आपल्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या सर्वच वक्तव्यांकडे काणाडोळा करण्याचा पोक्तपणा नेहमीच दाखवला. ट्रम्प, चीनचे क्षी जिनपिंग वगैरेंबाबत आपण काही बोलतच नाही तेच बरे. पण आपल्या नेत्यांचे मौन त्यांच्या अमेरिकावासी समर्थकांनीही पाळावे असे काही नाही.

म्हणूनच भारत सरकारने ट्रम्प वक्तव्यांकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग चोखाळला असला तरी अमेरिकावासी भारतीयांनी मात्र आता ठाम भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे, हे निश्चित. या अमेरिकास्थित भारतीयांची मातृभूमीवर (म्हणजे भरतभूवर) किती निष्ठा आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘एचवनबी’ मार्गाने असो, ‘एमएस’ करण्याच्या मिषाने असो वा तेथे आधीच गेलेल्याचे जोडीदार म्हणून जाणे असो; सच्चा भारतीय हा अमेरिकेत जाण्याची एकही संधी सोडत नाही. पण त्यामागे त्यांचे भारतावर असलेले प्रचंड प्रेम असते हे येथे राहणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी’, हा झाला इतिहास. वर्तमान ‘पिल्ले कमावती डॉलर, चित्त त्यांचे रुपयावर’ असे आहे. हे सारे भारतमाताप्रेमी तेथे राहून घाम गाळतात, डॉलर कमावतात आणि त्यांच्या मूठभर डॉलरांची घरवापसी करून भारतात परातभर रुपये होतात ही केवढी देशसेवा. भारतमातेच्या चरणी गेल्या वर्षी जवळपास १३,५०० कोटी डॉलर जमा झाले. त्यातील साधारण २७-२८ टक्के एकट्या अमेरिकेतून आले. यावरून अमेरिकावासी भारतीय किती कमावतात हे दिसते. आता या साऱ्यांनी आपली शारीरिक आणि आर्थिक कमाई देशप्रेमासाठी- म्हणजे ट्रम्प यांच्या विरोधात- पणाला लावावी आणि भारताचा वारंवार अपमान करणाऱ्या या अमेरिकी अध्यक्षास धडा शिकवावा. अनेक हिंदू-धर्माभिमानी संघटनांच्या अमेरिकी शाखा आहेत. त्या शाखाशाखांतून ट्रम्प यांच्याविरोधात राजकीय डावपेचांचे आदेश देता येतील. त्याचबरोबर ट्रम्प यांस घायकुतीला आणण्याचा आणखी एक मार्ग सध्या अमेरिकेत उपलब्ध झालेला आहे.

तो म्हणजे निदर्शनांचा. ‘सम्राट’ ट्रम्प यांच्या विरोधात त्या देशातील लोकशाहीप्रेमी एकवटले असून अमेरिकेच्या शहरा-शहरांत ट्रम्प यांचा निषेध हजारोंच्या उपस्थितीत होऊ लागलेला आहे. या जमावात अमेरिकावासी भारतीय सध्या तरी मोठ्या प्रमाणावर दिसत नाहीत, पण देशप्रेमासाठी त्यांनी जरूर सामील व्हावे आणि भारतीयांच्या संख्येची ताकद दाखवावी. त्यासाठी वाटल्यास आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे सहाय्य घ्यावे. इतरांचा कात्रजचा घाट करण्याचे कौशल्य त्यांच्या ठायी मुबलक आहे असे मानण्याचा प्रघात आहे. तेव्हा त्यांची मदत घेऊन ट्रम्प यांच्या विरोधात तेथील भारतीयांनी अवघा हलकल्लोळ करावा. तो करता येणे आपल्या भारतीयांस तसे अवघड न जावे. नवरात्रीतील गरबा, गणेशोत्सव आदींच्या मिरवणुका परदेशी भूमींवर काढून तेथील मंडळींची श्रवणशक्ती बधिर करण्याचा अनुभव तसेही परदेशस्थ भारतीयांसही मुबलक असेलच. तो त्यांनी आता ट्रम्प यांच्या भारतविरोधी भूमिकेच्या विरोधासाठी कामी आणून त्यांच्यावरील दबाव वाढवावा. आपल्या नेत्यांची ट्रम्प यांच्याकडून वारंवार केली जाणारी अडचण रोखायची असेल तर आता हाच एक मार्ग आहे. अमेरिकेतील भारतीयांनो एक व्हा…! तसे आपण ट्रम्प यांच्या विरोधात एक झालो नाही तर ‘हा व्यर्थ भार विद्योचा’ असेच म्हणावे लागेल आणि त्यानंतर ‘ही फसगत झाली तैशी’ हे मान्य करून उपयोग होणार नाही.