दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती नुकतीच (१ जुलै) झाली. त्यांचा जन्मदिन राज्यात ‘कृषिदिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांनी जून १९६५ मध्ये सुरू केलेल्या कृषी विभागाच्या ‘शेतकरी’ मासिकाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त…
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. औद्योगिकदृष्ट्या अत्यंत अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या या राज्यात आजही ५५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या चरितार्थासाठी शेतीवर अवलंबून आहे. वसंतराव नाईक संयुक्त महाराष्ट्रापूर्वीच्या मुंबई राज्यात यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूलमंत्री होते.
१९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी सुमारे १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या. महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्यात कारकिर्दीत झाली, असे म्हणता येईल. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले.
शेतीचा विकास करण्यासाठी कृषी संशोधन, कृषी विषयक योजना आणि संशोधित तंत्रज्ञान प्रभावी रीतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जून १९६५ मध्ये ‘शेतकरी’ मासिकाची सुरुवात करण्यात आली. हे मासिक वसंतराव नाईक यांच्या कल्पनेतून जन्माला आले. आता त्या मासिकाला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्याच्या कृषी विकासातील महत्वपूर्ण बाबींचा परामर्श घेण्यासाठी आणि आधुनिक शेतीची माहिती तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी ‘शेतकरी’ मासिकाव्यतिरिक्त कोणतेही अन्य चांगले साधन त्या काळात नव्हते. हे मासिक म्हणजे कृषी विस्ताराचे एक अद्वितीय माध्यम ठरले.
डॉ. माधवराव बाळासाहेब घाटगे कृषी संचालक असताना कृषी माहिती अधिकारी असलेल्या डॉ. वा. ब. राहुडकर यांच्यावर ‘शेतकरी’ मासिकाच्या संपादनाची जबाबदारी होती. डॉ. घाटगे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील होते. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी. एजी. ही पदवी १९२७ मध्ये संपादन केली. इंग्लंड येथील वेल्स विद्यापीठाची कृषी अर्थशास्त्राची पीएच.डी. पदवी त्यांनी १९३४ ते १९३६ दरम्यान प्राप्त केली होती. १९५३ ते १९५८ दरम्यान ते भारत सरकारचे अॅग्रिकल्चरल मार्केटिंग अॅडव्हायझर म्हणून दिल्ली येथे काम पाहत होते, तर ‘शेतकरी’ मासिकाच्या संपादनाची जबाबदारी सोपविलेले डॉ. राहुडकर यांनी एम. एएससी. अॅग्रि., एम. ए. (अमेरिका) व असो. आयएआरआय (अॅग्रॉनॉमी) मधील पीएच. डी. पदवी मिळविली होती.
वसंतराव नाईक देशाच्या यशस्वी हरितक्रांतीचे बिनीचे शिलेदार होते. नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी ते स्वतः लक्ष घालून ‘शेतकरी’ मासिकात विशिष्ट लेख व माहिती प्रसिद्ध करण्यास सांगत. मे १९६६ मध्ये ‘शेतकरी’ मासिकात नांगर कसा जुंपावा, या बाबत कृषि अभियंता वंजारी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता, त्यात नांगराचे महत्व पटवून देण्यासाठी, ‘फिरेल फाळ तर जाईल काळ’, असे वर्णन करून नांगर वापराचे महत्व व तंत्र सविस्तरपणे शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले होते. या सारख्या अनेक महत्वपूर्ण घडामोडींचा ‘शेतकरी’ मासिक हा एक संदर्भग्रंथ ठरला.
कृषी माहिती अधिकारी डॉ. वा. ब. राहुडकर यांनी जून १९६५ ते जून १९६७ दरम्यान संपादकपदाची धुरा सांभाळली. तेव्हापासून २०१५ पर्यंत २२ हून अधिक संपादक झाले. आनंद बापूराव पाटील यांनी जुलै १९६७ ते जुलै १९८४ अशी एकूण १७ वर्षे सर्वाधिक काळ संपादनाची जबाबदारी पेलली. त्या काळी कृषी क्षेत्रातील हे पहिले मासिक म्हणून अत्यंत लोकप्रिय झाले होते. आ. बा. पाटील व ‘शेतकरी’ मासिक असे एक अतूट नाते निर्माण झाले होते. राज्यात ‘शेतकरी’ मासिकाच्या प्रसारात पाटील यांचे योगदान अमूल्य आहे. तद्नंतर जानेवारी २००८ मध्ये ३० टक्के कमिशनवर ‘शेतकरी’ मासिक खासगी स्टॉलवर आणणे व ‘शेतकरी’ मासिक वर्गणीदार वाढीबरोबरच ते नफ्यामध्ये चालविण्याचे काम विनयकुमार आवटे संपादक असताना झाले. उज्ज्वला बाणखेले या संपादक असताना मे २००९ मध्ये ‘शेतकरी’ मासिकाचा संपूर्ण अंक रंगीत स्वरूपात प्रसिद्ध झाला.
‘शेतकरी’ मासिक वर्गणीदारांनी जुलै १९७१ मध्ये ६३ हजारांचा टप्पा ओलांडला तर सप्टेंबर १९७३ मध्ये एक लाख, सप्टेंबर १९८१ मध्ये दीड लाख व डिसेंबर १९९३ मध्ये दोन लाख वर्गणीदारांपर्यंत हे मासिक पोहोचत होते. यावेळी डी. के. धट हे संपादक होते. राज्यातील साखर कारखान्यांनी त्यांच्या सर्व सभासदांना ‘शेतकरी’ मासिकाचे सभासद करण्यात पुढाकार घेतल्यामुळे वर्गणीदार तर वाढलेच, पण त्याबरोबर उसाचे उत्पादन वाढण्यास चालना मिळाली. देशातील सर्वाधिक मराठी भाषेतील मासिक खपाचा बहुमान ‘शेतकरी’ मासिकाला अनेक वेळा मिळाला.
मासिकाची छपाई १९६५ ते १९७० दरम्यान शासकीय फोटो झिंको मुद्रणालय, मुंबई येथे होत होती. एप्रिल १९७० ते एप्रिल १९७४ दरम्यान जनसेवा मुद्रणालय, शुक्रवार पेठ, पुणे येथे व जानेवारी १९७६ पासून महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय, पुणे येथे ऑगस्ट १९८२ पर्यंत होत होती. सप्टेंबर १९८२ पासून जून १९९२ पर्यंत ‘शेतकरी’ मासिकाची छपाई विदर्भ विकास महामंडळ संचालित शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्स, नागपूर या ठिकाणी होत होती. जुलै १९९२ पासून छपाई पुन्हा महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय, पुणे येथे सुरू झाली. सध्या ‘शेतकरी’ मासिकाची छपाई आनंद पब्लिकेन्स, जळगाव येथे होत आहे. मे २००९ पासून संपूर्ण अंक रंगीत स्वरूपात प्रकाशित करण्यास सुरुवात झाली.
२०११-१२ मध्ये हे मासिक स्पर्धात्मकरीत्या व्यावसायिक पद्धतीने चालावे यासाठी संपादनाचे काम बाह्यस्त्रोताद्वारे (आऊटसोर्स) करून देण्यात आले. के. व्ही. देशमुख, विनय आवटे, उज्ज्वला बाणखेले, विनायक देशमुख आदींनी पदसिद्ध संपादक म्हणून मासिकासाठी खूप काम केले. देशमुख व आवटे हे दोघे अधिकारी कालांतराने कृषी संचालक झाले. या मासिकाचा खप दोन लाखांवर गेला. परंतु आज खप ४० हजार एवढा रोडावला आहे. दर्जाहीन मजकूर, अचूक संपादनाचा अभाव, अंक महिना-महिना उशिरा शेतकऱ्यांपर्यंत पोहोणे अशा अनेक कारणांमुळे हे मासिक आता शेतकऱ्यांच्या मनातून उतरले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ‘शेतकरी’ मासिकात लेख व माहिती कुठलेही संपादन, मुद्रितशोधन न होता प्रसिद्ध होत आहे. कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांचे नाव बदलून तेच ते शैक्षणीक धाटणीचे लेख वाचकांच्या माथी मारले जात आहेत. अत्यंत गंभीर बाब म्हणजे सध्या छपाई करणाऱ्या ठेकेदाराकडे कंत्राटी काम करणारा डीटीपी ऑपरेटरच या मासिकाचा संपादक म्हणून काम पहात आहे. शासनाने संपादकीय काम आऊटसोर्स करताना ज्या अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत, त्यांचा हा भंग आहे.
वसंतराव नाईक यांनी १९६५ मध्ये हरित क्रांतीच्या काळात अत्यंत दूरदृष्टीने हे प्रकाशन सुरू केले होते. सुमारे ६० वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी सुरू असलेले देशातील हे एकमेव नियमित प्रकाशन आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘शेतकरी’ मासिकाची दखल घेतली होती. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री, कृषिमंत्री मन लावून या मासिकात लक्ष घालत. पुढे अनेक कृषी आयुक्तांनी या मासिकात लक्ष घातले. हे मासिक आता कृषी विभागाची अनास्था, ठेकेदाराची मनमानी आणि दर्जाहीनतेमुळे मरणपंथाला लागले आहे.
या अंकाची आगाऊ वर्गणी शेतकऱ्यांकडून घेतली जाते. अलीकडे तर शेतकऱ्याने एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेतला तर त्याच्याकडून वर्गणीचे पैसे घेऊन अंकविक्रीचे लक्ष्य पूर्ण केले जाते. बाजारात हा अंक उपलब्ध होत नाही. या शिवाय संबंधित मुद्रकाकडून (प्रिंटर) गेल्या काही वर्षांत अंकाची वेळेवर छपाई न करणे, अंक वेळेत पोस्टात न टाकणे व पर्यायाने शेतकऱ्यांना मासिक दोन-तीन महिने उशिरा मिळणे असे अनेक प्रकार झाले आहेत. यासाठी संबंधित प्रिंटरला दंडही आकारण्यात आला आहे. तरीही त्याच प्रिंटरला गेली सुमारे १२ वर्षे सातत्याने छपाईचे काम मिळत गेले.
वसंतरावांनी शेतीच्या विकासात दिलेल्या बहुआयामी योगदानात ‘शेतकरी’ मासिकाची भूमिका मोठी आहे. कारण, वसंतरावांनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली तेव्हा ते तुटीचे राज्य होते, अन्नधान्याच्या संकटात होते आणि दुष्काळाच्या सावटात होते. विदर्भात असमाधान आणि मराठवाड्यात विकासाच्या अनुशेषावरून वादळ उठले होते. पश्चिम महाराष्ट्राला ‘हा’ मुख्यमंत्री आपल्यावर लादलेला वाटला तर कोकणाला त्याचे दूरचे असणे खटकणारे होते. वसंतरावांनी मुख्यमंत्री पद सोडले तेव्हा राज्याची तूट भरून निघाली होती. अन्नधान्यात स्वयंपूर्णता आली होती. मुंबईतील असंतोष आणि विदर्भातील असमाधान शमले होते, मराठवाड्याच्या अनुशेषावर काही प्रमाणात मात करण्यात यश आले होते आणि कोकणचा त्यांच्या विषयीचा दुरावा मिटला होता. यशवंतरावांनी चालना दिलेल्या सहकाराच्या चळवळीला वसंतरावांनी पुढली ११ वर्षे बळ दिले. महाराष्ट्रात ऊस उत्पादन वाढले. त्यातून साखरेचे शंभरावर कारखाने उभे राहिले. द्राक्षाच्या शेतीला प्रोत्साहन देण्याचे कामही त्यांच्याच काळातील. दुधाचे उत्पन्न वाढावे, शेतकऱ्यांना उत्पन्नाची जास्तीची साधने उपलब्ध व्हावीत, असा ध्यास त्यांनी सदैव घेतला.
वसंतराव नाईक यांनी त्यांच्या आयुष्यात मिळविलेले यश प्रचंड मोठे होते. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील गहुली या खेड्यात एका भटक्या जातीत जन्माला झालेल्या वसंतरावांनी बुद्धिमत्ता, परिश्रम व निष्ठेच्या बळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद तीनदा भूषविले. त्यांनी राज्यात सुरू केलेल्या अनेक योजना राष्ट्रपातळीवर स्वीकारल्या गेल्या, यातूनच त्यांचे वेगळेपण आणि मोठेपण दिसून येते.
dattatray.jadhav@expressindia.com