प्राची बर्वे
नवरात्रात शेजारून भोंडल्यातले ‘श्रीकांता कमलकांता अस्से कस्से झाले…’ असे गाणे ऐकू आले. खरे तर दरवर्षी भोंडल्याच्या काळात भोंडल्याच्या इतर गाण्यांबरोबरच कुठून ना कुठून हे गाणे हमखास कानावर येते. पण यावेळी माझी मैत्रीण माझ्या घरी होती आणि तिचा नवरा मानसिक आजारी असल्याने थोडी काळजीत होती. तिला त्याच्या आजारपणाबद्दल कोणाशीही बोलणे अवघड वाटत होते. त्यामुळे ते गाणे ऐकून तिचा बांध सुटला आणि म्हणाली ‘असं कसं ग लोक हे गाणं म्हणू शकतात?’.
या गाण्यात तिकडून वेडा (?) येतो, डोकावून पाहतो आणि चारचौघे करतील त्यापेक्षा वेगळी कृती करतो. तो का तसे करतो ते कुणी समजूनच घेत नाही. पिढ्यानपिढ्या हे गाणे भोंडल्यात म्हटले जातेय. ज्या काळी गाणे तयार झाले असेल, अंदाजपंचे ५० वर्षांपूर्वी, समाजाला मानसिक आजाराविषयी समजत नव्हते ते ठीक, पण आज? मेंदूतील हार्मोन्स कमी-जास्त झाल्यामुळे ‘वेगळे वागणे (मानसिक आजार)’ होते हे विज्ञानाने आता सिद्ध केले आहे. मधुमेहामधे यकृतात इन्सुलिन हार्मोन कमी-जास्त होते. पण समाजाला शारीरिक आजार मान्य आहे, तो स्वीकारता येतो, पण मानसिक आजार नाही.
‘मला चहा बिनसाखरेचा चहा कर हं’ म्हणून मधुमेह मिरवलाही जातो, मग मानसिक पातळीवर आजारी असलेल्या माणसाला ‘वेडा’ का म्हणायचे? ‘अमुक-अमुक आजार असलेली व्यक्ती’ असे म्हणायला काय हरकत आहे? गोळया घेतल्या किंवा इन्सुलिन इंजेक्शन घेतले की मधुमेह नियंत्रित होतो तसेच गोळ्या, इंजेक्शन, समुपदेशन घेऊन मानसिक आजारी माणूसही चांगले वागतो, सर्वसामान्य आयुष्य जगतो. पण आपल्या समाजात तसे होत नाही. मुळात मानसिक पातळीवर आजार होऊ शकतो, आणि योग्य आणि नियमित उपचारांनी तो बरा होऊ शकतो, हेच लोकांना कळत वा पटत नाही. कळले किंवा पटले तरी ते स्वीकारता येत नाही. कारण मानसिक पातळीवर आजारी होणे किंवा मनोविकार होणे म्हणजे वेडा वा वेडी होणे नाही, हे कुणाला समजूनच घ्यायचे नसते. यामागे सगळ्यात प्रमुख कारण असते ते म्हणजे समाजाची भीती.
साहजिकच ‘लोक वेडा/वेडी म्हणतील’ म्हणून मानसोपचार लपवले जातात. समाजाचा त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, व्यक्तीवर ‘वेडा/वेडी’ असा शिक्का मारतो, ज्यामुळे त्या व्यक्तीला रोजचे सर्वसामान्य जगणे अवघड होऊन बसते. कारण नसताना तिला ‘अक्षम’ ठरवले जाते. समाजात जर अशी वागणूक दिली जात असेल तर मग कोण आपला किंवा आपल्या आप्तस्वकीयांचा आजार कबूल करेल आणि उपचार करवून घेईल? आजार मान्य केला जात नाही म्हणून उपचार केले जात नाहीत. उपचार केले जात नाहीत, म्हणून आजार ‘बरा होत’ नाही असे हे दुष्टचक्र सुरूच राहते. याच दुष्टचक्रात अडकलेली ‘वेड्याची बायको’ भोंडल्याच्या गाण्यात म्हणते ‘अस्स कस्स झालं, वेडं नशिबी आलं’ पण आजच्या जमान्यातील अशा बायकोला कुणीतरी सांगायला हवे ना, की बाई तूच तुझ्या नशिबाला जबाबदार आहेस, नवऱ्यावर उपचार करणे सर्वस्वी तुझ्या हातात आहे.
गाण्यातली मानसिक आजारी व्यक्ती करंजीला होडी, लाडूला चेंडू म्हणते कारण तिचे वास्तवाचे भान हरवले असते आणि त्यामागचे कारण शारीरिक म्हणजेच मेंदूतील हार्मोन्स कमी-जास्त होणे हे असते. शरीराच्या आतील कमतरता ‘बाहेरील’ उपायांनी भरून काढता येत नाहीत. त्याला मनोविकार तज्ञाच्या सल्ल्याने, ते सांगतील तितका काळ औषधोपचार घ्यावे लागतात, मानसोपचार तज्ञाचे समुपदेशन घ्यावे लागते. व्यक्तीचे वास्तवाचे भान कमी-जास्त झाले किंवा तिची विचारपद्धती अविवेकी असेल तर त्याच्या परिणामी शिक्षण-नोकरीत धरसोड, कौटुंबिक नात्यामध्ये प्रश्न, समाजात माणसांशी जुळवून न घेता येणे असे घडताना दिसते. या प्रश्नांचा परिणाम म्हणून तिला स्वतःला तसेच तिच्या कुटुंबियांना आनंदी, सामान्य जीवन जगता येत नाही. अशा व्यक्तींना औषधे, समुपदेशन घेऊन सर्वसामान्य कार्यक्षम जीवन जगता येते, हे मात्र खूप जणांना माहिती नसते.
आजही समाजात मानसिक आजाराविषयी अज्ञान आहे आणि अज्ञान आहे म्हणून भीती व गैरसमज आहेत. भीतीपोटी आजारी व्यक्ती व तिच्या कुटुंबियांना समाज सामावून घेत नाही. हे अज्ञान कसे दूर होईल? तर माहिती घेऊन! आज मनोविकार तसेच मानसोपचार या विषयाचा भरपूर अभ्यास झाला आहे. त्यावर माहिती देणारी भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत, औषधे उपलब्ध आहेत. गुगल मित्र (शास्त्रशुद्ध माहिती देणाऱ्या वेबसाईटस) आहे, सामाजिक संस्था/स्वयंसेवक आहेत. हे सगळे या आजारांविषयी माहिती देतात, योग्य मार्ग सुचवतात. योग्य वेळी, योग्य उपचार मिळाले तर मानसिक आजारी व्यक्तींना सर्वसामान्य जीवन जगणे अजिबात अशक्य नसते.
मानसिक आजाराविषयीचे आपले अज्ञान दूर करण्यासाठी स्वतःलाच पावले उचलावी लागतील. त्यासाठी वेड्याच्या बायकोबरोबरच, तिच्या नवऱ्याने आणि समाजानेही सीमोल्लंघन करायला हवे, बरोबर ना?
मानसिक आरोग्य क्षेत्र स्वयंसेवक
(एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ, पुणे)