तुषार रहाटगावकर
सध्या मानवी लोभामुळे निसर्गाचे होत असलेले अविचारी शोषण हा जागतिक चिंतेचा विषय ठरला आहे. सभ्यतेच्या शिडीवर चढत असताना मानवाच्या गरजा वाढल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर करून पृथ्वीचे संतुलन बिघडवले गेले. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींचे विचार आज अधिक प्रासंगिक वाटतात. गांधीजींचा जन्मदिवस हा मानवतेच्या सर्वोच्च मूल्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. “पृथ्वीवर प्रत्येकाच्या गरजा भागवण्याएवढी साधने आहेत, पण प्रत्येकाच्या लोभासाठी नाहीत,” हे त्यांचे कालातीत वचन आज हवामानबदलाच्या आव्हानांमध्ये अधिक सुसंगत भासते.

गांधीजींनी कधी ‘पर्यावरणशास्त्र’ किंवा ‘पर्यावरण संरक्षण’ अशी संज्ञा वापरली नाही, तरीही त्यांच्या जीवनकृती व विचार यातून ते जगातील पहिले पर्यावरणवादी ठरतात. हिमालय व नद्या यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. अल्मोडा (१९२१) येथे त्यांनी लिहिलेले शब्द आजही तितकेच अर्थपूर्ण आहेत: “हिमालय नसता तर गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू नसत्या; पाऊस नसता आणि भारत वाळवंट झाला असता.” पृथ्वी व निसर्गाप्रती योग्य वर्तनाबाबत त्यांनी दिलेला इशारा ही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष आहे. गांधीजींच्या पर्यावरणवादाचा गाभा त्यांच्या समग्र दृष्टिकोनात दडलेला आहे. “मला केवळ मानवांशी नव्हे, तर कीटक-मुंग्यांशीही बंधुभाव ठेवायचा आहे; कारण आपण सारे एका देवाची अपत्ये आहोत,” असे ते सांगत. सर्व सजीवांमध्ये एकात्मतेची भावना हीच त्यांची पर्यावरणाची मूलभूत संकल्पना होती. त्या अर्थाने, गांधीजी हे पहिल्या काही पर्यावरणवाद्यांपैकी एक ठरतात. रामचंद्र गुहा यांनी १९९८ सालीच ‘महात्मा गांधी ॲण्ड द एन्व्हायर्न्मेंट मूव्हमेंट इन इंडिया’ असा निबंध लिहिला होता, हे यासंदर्भात नमूद करण्याजोगे आहे.

पाश्चात्य औद्योगिकीकरण व आंधळा भौतिकवाद यावर त्यांनी नेहमीच टीका केली. अर्थात, मानवी श्रमाचं मोलच नाकारणाऱ्या महाकाय यंत्रांना गांधीजींचा विरोध (तोही ऐन विसाव्या शतकाच्या सुरुवातीला) दिसतो, पण मानवी कष्ट कमी करण्यासाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या शिलाई यंत्रासारख्या छोट्या यंत्रांचे स्वागतच गांधीजींनी केले होते. हा विरोधाभास नव्हे. मानवी श्रमांमध्ये आनंदाचा भागही असतो आणि महाकाय यंत्रामुळे माणसाचा आपण काहीतरी केल्याचा आनंदच हिरावला जातो, हा विचार त्यामागे आहे.

हिंद स्वराज (१९०९) मध्ये त्यांनी स्पष्ट केले की, जर भारताने पाश्चात्य विकासमार्ग स्वीकारला, तर आपल्या गरजा भागवण्यासाठी पृथ्वी अपुरी पडेल. हवा, पाणी, जमीन व जंगल हे पूर्वजांकडून वारसा म्हणून मिळालेले नाहीत; ते पुढील पिढ्यांची संपत्ती आहे, हा त्यांचा ठाम आग्रह होता. गांधीजींचे ‘स्वदेशी’ तत्वज्ञान स्थानिक संसाधनांच्या सुज्ञ वापरावर आधारित होते. त्यांनी कुटीर उद्योग, शेती, ग्रामव्यवस्था यांना प्रोत्साहन दिले. १९३० च्या दांडी पदयात्रेद्वारे त्यांनी मिठासारख्या नैसर्गिक संसाधनावर सामान्य माणसाचा हक्क अधोरेखित केला. त्यांचे ‘सर्वोदय’ तत्वज्ञान सर्वांसाठी प्रगती, शाश्वत विकासाचा पाया मानले जाऊ शकते. समानता, अहिंसा, स्वावलंबन, स्त्री-पुरुष समान हक्क, शिक्षणाचा प्रसार आणि अस्पृश्यता निर्मूलन या सर्व गोष्टी त्यांच्या शाश्वत जीवनदृष्टीशी घट्ट निगडित होत्या.

गांधीजींची ‘ग्रामस्वराज्या’ची कल्पना ही कमीतकमी गरजांमध्ये सुखी-समाधानी जीवनाचा आदर्श ठेवणारी होती. यात गावातील कारागीरांवर भर होताच (त्यामुळे गांधीजींना बलुतेदारी कायम ठेवायची होती का, अशी टीका होते- त्यावर उत्तरही आहे. गांधीजींच्या ‘नयी तालीम’मध्ये, पुस्तकी शिक्षणाइतकाच कारागिरी शिकण्यावरही भर होता. मुले केवळ सूतकताई नव्हे तर सुतारकामासारखी कौशल्येही शिकत. त्यामुळे परंपरागत/ पिढीजात पद्धतीनेच कारागिरी सुरू राहावी, असा गांधीजींच्या या आग्रहाचा अर्थ राहात नाही. असो.) पण या ग्रामस्वराज्यात तत्कालीन स्वच्छतेच्या- आजच्या भाषेत ‘मल व कचरा व्यवस्थापना’च्या पद्धतींचाही विचार झाला होता. काहीही वाया जाऊ द्यायचे नाही हा (रीसायकलिंगचा) आग्रह बीजरूपाने त्यांनी त्या वेळी मांडला होता.

गांधीजींच्या पर्यावरणवादी दृष्टिकोनाची सुसंगती आजच्या पर्यावरण चळवळींमध्ये दिसते. चिपको आंदोलन, नर्मदा बचाव किंवा इतर उपक्रम अहिंसा व सविनय कायदेभंग या गांधीवादी मार्गावरच चालले. जागतिक पातळीवरही चार मूलभूत तत्त्वे अहिंसा, शाश्वतता, आदर व पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक मानली जातात आणि ही चार तत्त्वे गांधीजींच्या जीवनाचा गाभा होती. स्वच्छता, पाणी वाचवणे, वृक्षारोपण, पावसाच्या पाण्याचे साठवण या विषयांवर त्यांनी दशकांपूर्वी दिलेले मार्गदर्शन आजही मार्गदर्शक आहे. आधुनिक काळातील प्रदूषण, गर्दी, हवामान बदल या समस्या त्यांनी दूरदृष्टीने आधीच ओळखल्या होत्या. आज जग हवामान संकटांशी झगडत असताना गांधीजींची शिकवण अधिकच आवश्यक भासते. त्यांचा पर्यावरणवाद संघर्षावर नव्हे, तर संयम व त्यागावर आधारित होता. उपभोगवादाच्या मोहातून बाहेर पडून निसर्गाशी सुसंवाद साधल्यासच जागतिक तापमानवाढ आणि संसाधनांचा ऱ्हास रोखता येईल. गांधीजी भारतापुरते नव्हे, तर संपूर्ण जगासाठी आहेत. त्यांची शिकवण स्वीकारूनच मानवजात शाश्वत भविष्याचा मार्ग शोधू शकते.

tushar.rahatgaonkar@gmail.com