किशोर पाकणीकर
दरवर्षी स्टॅनफर्ड–एल्सेव्हियर या यादीत जगातील अव्वल वैज्ञानिकांची नावे प्रसिद्ध होतात. त्यात भारतीय शास्त्रज्ञांची संख्या मोठी असली तरी आपल्या संशोधन व्यवस्थेतील खरी आव्हाने, मर्यादा आणि सुधारणा यांवर विचार करण्याची गरज आहे.
दरवर्षी स्टॅनफर्ड–एल्सेव्हियर ही यादी जाहीर होते आणि जगातील अव्वल दोन टक्के वैज्ञानिकांची नावे त्यात झळकतात. भारतात मात्र ही यादी एक सोहळाच बनते. विद्यापीठं घोषणा करतात, वृत्तपत्रं नावे छापतात आणि समाज माध्यमांवर अभिनंदनाचा पाऊस पडतो. जगात इतर कोठेही याचा इतका गवगवा होत नाही. माझे नावही सुरुवातीपासून यात आहे. त्यामुळे ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ असे नक्कीच नाही. पण खरी शंका अशी आहे, या याद्या खरंच आपली प्रगती दाखवतात का, की फक्त प्रगतीचा भास निर्माण करतात? हजारो भारतीय संशोधक यात असतानाही प्रयोगशाळांत अजूनही कमी तरतूद, अपुरी साधनं आणि तरुण संशोधकांसाठी नोकरीच्या संधी कमी हा सूर कायम ऐकू येतो.
यंदा एका वर्षाच्या कामगिरीवर आधारित यादीत ६,२०० पेक्षा जास्त भारतीय वैज्ञानिक, तर करिअरभराच्या यादीत सुमारे ३,४०० नावे आहेत. हे आकडे मोठे दिसतात. पण ते खरोखर नवीन ज्ञान, नवे शोध आणि नवप्रवर्तन दाखवतात का? की फक्त लेख, संदर्भ आणि पेटंट्स यांची मोजणी करतात?
थोडं मागे पाहू. १०० वर्षांपूर्वी अशी यादी असती, तर सी. व्ही. रमन किंवा सत्येंद्रनाथ बोस यांची नावे त्यात दिसली असती का? रमन यांचे सुरुवातीचे लेख फारसे उद्धृत झाले नव्हते. तरी १९२८ मधला त्यांचा शोध इतका महत्त्वाचा ठरला की त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आणि भौतिकशास्त्र बदललं. बोस यांचा १९२४ मधला लेख सुरुवातीला कुणी प्रसिद्ध करायलाच तयार नव्हते. आइनस्टाइनने पुढाकार घेतला तेव्हाच तो प्रसिद्ध झाला. त्या काळी ना रमन, ना बोस या यादीत आले असते. पण त्यांच्या संशोधनाचा ठसा जगावर आजही आहे.
हवाई दलातील बदलत्या क्षणांचा साक्षीदार
त्या काळी संशोधक कमी, जर्नल्स मोजकी आणि संदर्भ मिळवण्याच्या संधीही मर्यादित होत्या. तरी त्यांच्या संशोधनाने जग हलवून टाकलं. त्यांचा मान लेखांच्या संख्येवर नव्हता, तर कल्पनांच्या खोलीवर आणि त्यांच्या प्रभावावर होता. आजचा प्रश्न असा आहे – आपली व्यवस्था अजूनही अशी मौलिकता ओळखते आणि प्रोत्साहन देते का? जागतिक तुलना केली तर हा फरक आणखी ठळक दिसतो. आइनस्टाइनचे आयुष्यभरात सुमारे ३००, बोहरचे १००, तर श्रोडिंजर आणि हायझेनबर्ग यांचे काहीशे. लेख प्रसिद्ध झाले. संख्या कमी होती, पण प्रभाव प्रचंड होता. आज मात्र काही जण हजारो लेख छापतात, संदर्भसंख्या वाढते; पण त्यांचे संशोधन मोठे वळण देत नाही. म्हणजेच यादीत ‘संख्या’ महत्त्वाची ठरते, ‘प्रभाव’ नव्हे.
ही संख्या मोजण्याची धावपळ फक्त व्यक्तीपुरती मर्यादित नाही. संस्था आणि उद्योगही यात गुंतले आहेत. त्यामुळे असा भास होतो की भारतात विज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. पण प्रत्यक्षात मात्र प्रयोगशाळा, उपकरणं, नोकरीच्या संधी कमी आणि धाडसी कल्पनांना लागणारा आधार यांचा तुटवडा आहे. खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा तरुणांना सुरक्षितता देऊन त्यांना नवे प्रयोग करू दिले जातात.
उदाहरण घ्या – २०२३ मध्ये सॅमसंगने आपल्या विक्रीतून तब्बल १० टक्के संशोधनावर खर्च केला. तर रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२३–२४ मध्ये महसुलाच्या फक्त ०.३६ टक्के संशोधनावर खर्च केला. अशी स्थिती राहिली तर क्रांतिकारी शोध अपवादच ठरतील. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) हे वेगळं उदाहरण आहे. मार्च २०२५ पर्यंत त्यांनी ८,८०० पेक्षा जास्त पेटंट अर्ज दाखल केले आणि ४,८२० पेटंट मंजूर झाले. पण अशा मोजक्या अपवादांनी देश पुढे जाऊ शकत नाही; भारताला टीसीएससारख्या १०० कंपन्या हव्यात.
फक्त पैशाचीच कमतरता अडथळा नाही. खरी गोष्ट अशी की – आपल्या शाळा–कॉलेजांतूनच विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकतेची ठिणगी पेटते का? विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण (STEM) फक्त गुण मिळवण्यासाठी मर्यादित राहतं की खरंच मुलांना प्रेरणा देतं? कुतूहलच जागलं नाही, तर प्रयोगशाळेत नवे शोध कसे लागणार? २०२१–२२ मध्ये भारतात जवळपास ४२ हजार विद्यार्थ्यांनी पी.एचडी. मिळवली. पण संशोधनाच्या, नोकरीच्या संधी कमी राहिल्या. खासगी क्षेत्राने या प्रतिभेला सामावून घेतलं नाही. म्हणूनच अनेक उत्तम प्रशिक्षित शास्त्रज्ञ परदेशात जातात किंवा आपल्या अभ्यासाशी संबंध नसलेल्या कामांकडे वळतात.
या यादीत मार्गदर्शन आणि संस्था उभारणी याला किंमत नाही. होमी भाभा, विक्रम साराभाई, एम. एस. स्वामिनाथन यांचा लौकिक त्यांच्या संशोधनाइतकाच त्यांनी उभारलेल्या संस्था आणि परिसंस्थांमुळे आहे. पण हे गुण संख्येच्या हिशेबात येत नाहीत. त्यांच्या कामाचा प्रभाव समाजावर आजही जाणवतो.
भारतीय शास्त्रज्ञांनाही या मर्यादा माहीत आहेत. पण निधी देणाऱ्या संस्था लेखसंख्या, एच इंडेक्स (h-index), सायटेशन काऊंट्स( citation counts) विचारतात, तेव्हा आकडे द्यावेच लागतात. नव्याने स्थापन झालेल्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (ANRF) च्या अर्जांतही हीच माहिती मागितली जाते. त्यामुळे स्टॅनफर्डसारख्या याद्यांकडे दुर्लक्ष करणं अवघड आहे. खरी गरज आहे ती आकडेवारीसोबत मौलिकतेचं, मार्गदर्शनाचं आणि समाजावरच्या प्रभावाचं मोजमाप करण्याची.
भारताकडे प्रतिभा आहे, परंपरा आहे, महत्त्वाकांक्षा आहे. आता गरज आहे ती धाडसी गुंतवणुकीची, STEM शिक्षण सुधारण्याची, प्रशिक्षित शास्त्रज्ञांसाठी नोकरीच्या संधी वाढवण्याची आणि मार्गदर्शन व संस्था-निर्मितीला लेखसंख्येसारखं मान देण्याची. आपण रँकिंगलाच यश मानलं, तर दरवर्षीचा सोहळा करून थांबू; पण खरी वैज्ञानिक ताकद उभारण्याचं काम अधुरं राहील. खरी ओळख तीच, जेव्हा भारत स्वतःच मानक बनेल.\
kpaknikar@gmail.com
माजी संचालक, आघारकर संशोधन संस्था, पुणे<br>अभ्यागत प्राध्यापक, आयआयटी मुंबई<br>
kpaknikar@gmail.com