पाच सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षकदिन म्हणून साजरा करतो; पण पाच सप्टेंबर हाच दिवंगत शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईकांचाही जन्मदिवस असून त्यांचा साधा उल्लेखही कुठे होत नाही. तेव्हा त्यांचेही स्मरण जिथे जिथे शिक्षकदिन होईल तिथे तिथे व्हायला हवे.
जे. पी. नाईक हे जागतिक पातळीवर मान्यता असलेले शिक्षणतज्ज्ञ होते ‘युनेस्को’ने गेल्या २५०० वर्षांतील जगातल्या शंभर शिक्षणतज्ज्ञांची यादी प्रसिद्ध केली, त्या यादीत भारतातील केवळ तीन शिक्षणतज्ज्ञांची नावे आहेत. त्यांपैकी एक महात्मा गांधी, दुसरे रवींद्रनाथ टागोर आणि तिसरे नाव जे. पी. नाईक यांचे आहे! या कीर्तीचीदेखील फारशी माहिती महाराष्ट्रला नसते. युनेस्कोने त्यांना आशिया खंडातील प्राथमिक शिक्षण-प्रसाराची योजना तयार करण्याची विनंती केली, कराची येथे आशियायी राष्ट्रांच्या परिषदेत त्यांनी सार्वत्रिकीकरणाची विविधांगी योजना मांडली, ‘कोठारी आयोगा’सारखा गाजलेला अहवाल नाईकांनी लिहिला हे फार थोडय़ांना माहीत आहे? आजची ‘अंगणवाडी योजना’ ही नाईकांच्या अहवालामुळे सार्वत्रिक झाली.
भारतात प्राथमिक शिक्षणाच्या सांख्यिकी नियोजनाचा आणि त्याच्याशी जुळणाऱ्या प्रशासकीय व अर्थसाहाय्याच्या योजना तयार करण्याचा पाया नाईकांनी घातला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयात त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. समाजविज्ञान संशोधन परिषदेला गती देऊन त्यांनी शिक्षण, आरोग्य व शेती या भारतीय पुनर्निर्माणासाठी कळीच्या कार्यक्षेत्रांना प्राधान्य दिले.
असे अकांचन आणि साधेपणाने काम करणे ही काय नाईकांची चूक होती की काय म्हणून या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मराठी माणसाला महाराष्ट्र आज विसरला? किमान या वर्षीच्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाला तरी त्यांचा जन्मदिवस असतो हे लक्षात घेऊन प्रत्येक शाळा व शासकीय स्तरावर तरी नाईकांनाही अभिवादन केले जावे. आज मोठय़ा प्रमाणात झालेले शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण या माणसाच्या खांद्यावर उभे आहे हे आपण विसरता कामा नये.
– हेरंब कुलकर्णी, अकोले (जि. अहमदनगर)
श्रीगणेशाला पुजत नाहीत, त्यांना बुद्धी येते कुठून?
दिल्लीतील अमराठी मैत्रिणींना महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची महती सांगताना माझे मलाच काही प्रश्न पडले. त्यांपैकी काही येथे मांडते आहे. गणपतीला दूर्वा, शमी, जास्वंदीची फुले, केवडा आदी आवडतात म्हणून ते वाहतात, आपल्या सण आणि देवांना आवडत्या गोष्टींमध्ये निसर्गाजवळ जाण्याचा आणि औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींची ओळख करून देण्याचा दृष्टिकोन आहे असा तर्क दिला जातो, पण खरे सांगा आपल्यापकी किती जणांनी घरी दूर्वाचा रस प्यायलाय किंवा औषध म्हणून वापरलाय आणि त्याचा नक्की उपयोग झालाय? पॅरेसिटेमॉल, व्हिक्स आणि बाम चांगले की वाईट यावर कितीही चर्चा झाल्या तरी प्रत्येक घरात ते असतेच आणि सर्रास वापरलेही जाते तसे काही कोणी दूर्वाचा रस वापरल्याचे ऐकिवात नाही. आपल्याकडे ना यावर काही संशोधन ना धड माहिती. उ गीच आमच्या पूर्वजांना सर्व माहिती होते या भ्रमात राहायचे आणि गुणधर्म सांगायचे. सर्वच वनौषधींची ही गत आहे.
बुद्धिदेवता म्हणून श्री गणेशाची पूजा केली जाते, परंतु जगभरातील लोक गणपतीची पूजा, आराधना न करतासुद्धा विचार कसा करतात? इतके हुशार, प्रज्ञावान कसे होतात? संशोधन करून, अभ्यासू वृत्तीने प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाणे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधणे आणि त्यावर आधारित तंत्रज्ञान विकसित करणे हे कसे करू शकतात?
महाराष्ट्राचा गणेशोत्सव संस्मरणीय असतोच असतो.. पण एकंदरच अर्थव्यवस्थेची प्रचंड उलाढाल, अगणित उद्योगांना चालना, तरुणाईची ऊर्जा, उत्साह याचा निचरा होण्यासाठी व्यासपीठ, चर्चा आणि विचारवंतांना आपली मते मांडण्याची संधी, कलाकारांच्या कलागुणांना वाव, विश्वास, श्रद्धा व जगण्याची आशा जागवण्यासाठी निमित्त आणि निर्माण झालेला अमाप उत्साह हेच गणेशोत्सवाचे फलित म्हणावे का?
वसुधा गोखले, नवी दिल्ली.
उपाय सर्वानी मिळून शोधावा, असे वातावरण भारतात आहे?
‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमाच उत्कट’ हा अग्रलेख (२ सप्टें.) वाचताना काही प्रश्न पडले. ते पुढीलप्रमाणे :
१) फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी पहिल्या १०० दिवसांत जी महत्त्वाची विविध विधेयके संमत करून घेतली त्यांचे परिणाम १०१व्या दिवसापासून दिसले की काही वर्षांनी दिसून आले?
२) अमेरिकेची मानसिकता उद्यमशीलतेवर आधारित आहे. त्यामुळेच फ्रँकलिन रुझवेल्ट आíथकदृष्टय़ा अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना कचरले नाहीत. आणि देशहितासाठी हे निर्णय योग्य आहेत हे समजण्याची कुवत तेथील दोन्ही पक्षांकडे व नेत्यांकडे होती, आजही आहे. असा देशहिताचा विचार करण्याची कुवत आपल्या कुठल्याही राजकीय पक्षाकडे वा नेत्याकडे आहे का?
३) भारतात मतदान होते ते वेळोवेळच्या (भडकलेल्या?) भावनेवर आणि दाखविलेल्या आरक्षणाच्या वा कर्जमाफीच्या गाजरावर. त्यामुळेच १०० दिवसांच्या आत झालेल्या निवडणुकीत जनतेची मते बदलल्याचे दिसत असावे. अशा जनतेकडे मोदींना परत मते मागावयाला जायचे आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी कित्येक दूरगामी फळ देणारे निर्णय घेऊन आणि राबवूनसुद्धा त्याची फळे येण्याचा आत दुधखुळ्या जनतेने त्यांचा पराभव केला. हा अनुभव पाठीशी असल्यानेच मोदी जपून पावले टाकत असतील का?
४) भारतीय मानसिकता निष्क्रियतेकडून उद्यमशीलतेकडे जावी हा हेतू स्तुत्य असला तरी त्यासाठी लोकसत्ताच्या अग्रलेखांत अनेकदा भारताची तुलना प्रगत देशांशी केलेली आढळते. परंतु भारतीयांना स्वत:ची तुलना प्रगत देशांऐवजी ‘पाकिस्तान’शी करावीशी वाटते. येथे सौदी अरेबियातसुद्धा समोर अमेरिकी माणसांची उद्यमशीलता, कष्टाळूपणा आणि त्याचमुळे येणारे आíथक स्थर्य दिसत असूनसुद्धा, आम्ही भारतीय आमची मानसिकता बदलावयास तयार नाही. आम्ही जास्त कष्ट वा काम करत नाही. रिकाम्या वेळात (म्हणजे नेहमीच, कार्यालयीन वेळेतही) दैवाला दोष देणे हाच आवडता उद्योग. ‘भारतात तेल नाही म्हणून आमच्याकडे गरिबी’ हा निष्कर्ष. यावर भारतात मुबलक असलेल्या कोळशाचे, थोरियमचे आणि इतर खनिजांचे काय? असा प्रश्न विचारला की प्रश्नाला भिडण्याऐवजी बगल देण्यात वाकबगार. असे अमेरिकेत नाही. ते लोक प्रश्नाला भिडतात आणि त्यावर सर्व जण मिळून उपाय शोधतात. असे वातावरण भारतात आहे का?
असो. आपण निष्क्रिय सरकारला दहा वष्रे देऊ शकतो तर मग (सध्या तरी) बोलघेवडय़ा दिसणाऱ्या सरकारला पाच वष्रे देण्यास काय हरकत आहे?
नरेन्द्र थत्ते, अल खोबर (सौदी अरेबिया)
व्यक्तीला देवत्व, हा विचारांचा ऱ्हास
छात्तिसगडमधील धर्म संसदेतील कथित ‘आदेशा’मुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली, ती म्हणजे ‘कोणाला देव म्हणावे व कोणाची पूजा करावी’ हा विषय पुन्हा चच्रेत आला. कोणत्याही सामान्य व्यक्तीने काही असामान्य कर्तृत्व केले की आपण त्यांना देव बनवून टाकतो, त्यांना दैवी अंश मानून त्यांची पूजा करत बसतो. एकदा का त्या व्यक्तीला देवत्व प्राप्त झाले की तिचे विचार मागे पडतात.. साईबाबांबाबतदेखील हेच झाले आहे.
– विक्रम लंके, पुणे
तुम्हाला काय वाटते?