कल्याण : कल्याण पश्चिमेतील गांधारी गाव हद्दीत एका निर्माणाधीन इमारतीवर मजूर म्हणून काम करणाऱ्या तीस वर्षाच्या मजुराला सोमवारी पहाटे मजूर वसाहतीमध्ये झोपला असताना विषारी सापाने दंश केला. या मजुराला तात्काळ खासगी, पालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.निशख्या नवीनचंद्र दलाई (३०) असे मरण पावलेल्या मजूर कामगाराचे नाव आहे.

निशख्या हे कल्याण पश्चिमेतील गांधारे गाव येथील गोल्डन वाॅक हाॅटेलजवळील निर्वाणा गार्डन इमारतीच्या नवीन इमारतीच्या बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते. या इमारतीवर काम करणाऱ्या मजुरांच्या सोयीसाठी विकासकाने या इमारत बांधकामाच्या बाजुला बंदिस्त निवारे बांधले आहेत. काम संंपल्यानंतर मजूर या निवाऱ्यात कुटुंबीयांसह राहतात. निशख्या हे मूळ ओरिसा राज्यातील गजापती जिल्ह्यातील काम्पागुडा गावातील रहिवासी आहेत. त्यांचा एक भाऊ लोअर पार्क येथे एका गृहप्रकल्पात इमारतीला सरकत्या खिडक्या बसविण्याचा व्यवसाय करतो.

रविवारी निर्वाणा इमारतीमध्ये दिवसभर काम केल्यानंतर निशख्या आणि त्यांचे इतर सहकारी आपल्या मजूर कामगार वसाहतीत परतले. भोजन झाल्यानंतर ते बंदिस्त कामगार निवाऱ्यात झोपी गेले. सोमवारी पहाटेच्या सुमारास निशख्या यांना झोपेत अस्वस्थ वाटू लागले. ते जागे झाले. त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला असह्य वेदना सुरू झाल्या होत्या. इतर कामगारांनी निशख्याची प्रकृती ढासळत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना एका रिक्षेतून आयुष रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथील डाॅक्टरांनी निशख्या यांना तपासले. त्यांनी निशख्याला कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय येथे नेण्याचा सल्ला दिला.

निशख्याला तातडीने पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. डाॅक्टरांनी निशख्याला तपासून तातडीने उपचार सुरू केले. त्यांना विषारी सापाने दंश केला असल्याचा प्राथमिक अंदाज डाॅक्टरांनी काढला. आवश्यक उपचार सुरू केल्यानंतर हळूहळू निशख्याची प्रकृती ढासळली. ते वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देईनासे झाले. त्यानंतर डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दंश केल्यानंतर विषारी साप तेथून निघून गेला होता. पावसाळ्यात मण्यार, घोणस या विषारी सापांचा सर्वाधिक प्रादुर्भाव असतो.

याप्रकरणी नटवर दलाई या निशख्या यांच्या भावाने खडकपाडा पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी प्राथमिक तपास करून नवख्याच्या मृत्युप्रकरणाची भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ प्रमाणे नोंद केली. कल्याण पूर्व, पश्चिमतेली शहर परिघावरील भाग हा झाडाझुडपांचा, उल्हास नदी काठचा आहे. या भागात सरपटणारे प्राणी अधिक प्रमाणात आहे. भक्ष्यासाठी त्यांचा संचार सुरू असतो. भक्ष्याचा पाठलाग करत एखादा विषारी सरपटणारा प्राणी अचानक नागरी वस्तीत घुसतो. तो वेळीच निदर्शनास आला नाही की तो माणसाला दंश करतो. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन दांडेगावकर याप्रकरणाचा तपास करत आहेत.