कल्याण: भौगोलिक दृष्ट्या चढ-उताराच्या भागात वसलेल्या आणि मागील २० वर्षापासून विकासापासून वंचित असलेल्या कल्याण पूर्व भागातील २० रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने शासनाकडे सादर केला आहे. काँक्रीट रस्ते कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून निधी उपलब्ध झाला तर ही कामे प्राधान्याने मार्गी लावणे शक्य होणार आहे, असे पालिकेने प्रस्तावात म्हटले आहे.
कल्याण पूर्व भाग हा लहान, मोठ्या टेकड्यांवर वसलेला आहे. या भागात चाळी, झोपड्या अधिक प्रमाणात आहेत. नागरीकरणामुळे मोठे गृहप्रकल्प कल्याण पूर्व भागात उभे राहत आहेत. कल्याण पूर्व भागाची लोकसंख्या सुमारे पाच लाखावर गेली आहे. या भागात प्रशस्त रस्ते नसल्याने हा भाग नेहमी वाहतूक कोंडी, पावसाळ्यात दलदल, पुराच्या विळख्यात अडकतो. पुणे-लिंक, १०० फुटी रस्ता, मलंग गड रस्त्यांव्यतिरिक्त या भागातील एकाही विकास आराखड्यातील रस्त्याचे नियोजनाप्रमाणे रूंदीकरण आणि काँक्रीटीकरण झाले नाही. या सर्व परिस्थितीचा विचार करून पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशावरून शहर अभियंता अर्जुन अहिरे आणि त्यांच्या सहकारी अभियंत्यांनी कल्याण पूर्व भागातील २० रस्त्यांच्या रूंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. काँक्रीट कामासाठी प्रस्तावित रस्ते तीनशे ते बाराशे मीटर लांबीचे आहेत.
कल्याण डोंंबिवली पालिका मागील २३ वर्ष शिवसेना-भाजपच्या ताब्यात राहिली. काँग्रेस राजवटीच्या काळात या पालिकेला नेहमीच दुजाभावाची वागणूक मिळाली. पालिकेला विकासापासून दूर असलेल्या २७ गाव, पालिका लगतच्या ग्रामीण भागाचा निधी अभावी विकास करता आला नाही. पालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. आता मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे आहेत. खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ पालिकांसाठी सुमारे दोन हजार कोटीचा निधी रस्ते, अन्य विकास कामांसाठी उपलब्ध झाला आहे. अशाच पध्दतीने कल्याण पूर्व भागासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला तर कल्याण पूर्व भागाचा काँक्रीट रस्ते कामातून कायापालट करणे शक्य होणार आहे, असा विचार करून पालिकेने शासनाकडे प्रस्ताव दाखल केला आहे.
प्रस्तावित रस्ते
ज, ड, आय प्रभागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, काटेमानिवली, सिध्दार्थनगर ते तिसगाव यु टाईप रस्ता, एफ केबिन ते जगदीश दुग्धालय, पावशे चौक ते शिवाजी काॅलनी, चिंचपाडा-अमराई-गावदेवी मैदान ते मलंग रस्ता, गणपती मंदिर ते लोक वाटिका, कैलासनगर ते साकेत, नितीन राज हाॅटेल ते फुले चौक. काटेमानिवली ते चिंचपाडा, पुणे लिंक ते जाईबाई विद्यामंदिर, खडेगोळवली रस्ता, विजयनगर-आमराई चौक. चेतना शाळा ते नेवाळी नाका, पिंगारा ते चेतना शाळा, सत्कार टाॅवर ते भगवान नगर, ख्रिस्तीअन सिमेट्री ते थोरात चाळ, रजिस्ट्रेशन कार्यालय ते गावदेवी मंदिर.
“कल्याण पूर्व भागातील महत्वाच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे दोन प्रस्ताव शासनाकडे दाखल केले आहेत. या रस्ते कामांमुळे पूर्व भागातील अनेक वर्ष रखडलेली कामे मार्गी लागतील. ” – अर्जुन अहिरे, शहर अभियंता, कडोंमपा.