ठाणे – खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके सहज उपलब्ध व्हावीत, तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसावा यासाठी कृषी विभागाने कोकण विभागात विशेष तपासणी मोहिमेचा राबवित आहे.या मोहिमेअंतर्गत कृषी विभागाकडून ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची चौकशी सुरू असून विविध अनियमिततेवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात ४, रायगड २, रत्नागिरी १२ आणि सिंधुदुर्ग १३ कृषी खत विक्री परवाने निलंबित करण्यासाठीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

खते ही पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची निविष्ठा आहे. खतांचा योग्य वापर झाला तर उत्पादनात लक्षणीय वाढ होते. मात्र अनेक व्यापारी शेतकऱ्यांना खोट्या ब्रँडची खते, कमी गुणवत्तेची उत्पादने, चुकीचे वजन किंवा जास्त दराने विक्री करून फसवतात. काहीजण खत साठवून ठेवतात आणि टंचाईच्या काळात भाव वाढवतात. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने सखोल तपासणीची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांनी ज्या केंद्रावरून खते खरेदी करतात, त्या ठिकाणी गोडावूनमधील साठा व ई-पॉस मशीनवरील साठा यामध्ये तफावत असता कामा नये. विक्रेत्यांनी फक्त ई-पॉस मशीनद्वारे खत विक्री करावी, विक्रीच्या वेळी साठा आणि दर यांचे फलक स्पष्टपणे लावावेत. तसेच, एका उत्पादनासोबत दुसरे उत्पादन घेण्याची सक्ती (लिंकिंग) करणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि तसे आढळल्यास कठोर कारवाई होणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये गुणनियंत्रण निरीक्षक, विभागीय भरारी पथक, जिल्हास्तरीय भरारी पथक कार्यरत असून कृषी निविष्ठांच्याबाबत त्यांचे बारकाईने लक्ष असून त्यांनी तपासणी मोहिमेंतर्गत निविष्ठा विक्रीमध्ये अनियमितता आढळून आल्याने आतापर्यंत कोकण विभागामधील ठाणे ४, रायगड २, रत्नागिरी १२ व सिंधुदुर्ग १३ एवढे निविष्ठा विक्री परवान्यांवर कारवाई प्रस्तावित केलेली आहे. तसेच कोकण विभागामध्ये १ एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत बियाणे विक्री परवाने २, खत विक्री परवाने २३, किटकनाशके १ असे परवाने रद्द, निलंबित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत या खतांच्याबाबत 3 पोलीस गुन्हा व किटकनाशकांबाबत १ पोलीस गुम्हा दाखल करण्यात आला आहे.