Actor Shashank ketkar: ठाणे – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आज, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमासाठी अनेक राजकीय नेत्यांसोबतच सुमारे २५ हजार नागरिक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच मराठी अभिनेते शशांक केतकर यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे एक सुंदर छायाचित्र शेअर केले आहे. मात्र या छायाचित्रासोबत लिहिलेल्या त्यांच्या काही ओळींनी नेटिझन्सचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
नवी मुंबई परिसरात आजचा दिवस ऐतिहासिक ठरत आहे. कारण दीर्घ प्रतिक्षेनंतर आज, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होत आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे. तसेच सुमारे २५ हजार नागरिक आणि कार्यकर्ते या भव्य कार्यक्रमाला उपस्थित असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नवी मुंबई विमानतळ हे ११६० हेक्टर जमिनीवर उभारलेले गेले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि सिडकोच्या संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. विमानतळाचे विविध अंगांनी चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर त्याची पहिली दृश्ये टिपण्यासाठी नागरिक सज्ज आहेत. देशाचे राष्ट्रीय फूल कमळावर आधारित स्टील आणि काचेपासून तयार केलेले तरंगते कमळ हे या विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचे आकर्षण असणार आहे. या विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलला चार महत्त्वाचे प्रवेशद्वार असणार आहेत. तसेच तीन महत्त्वाची केंद्र येथे असतील. या केंद्रांना अल्फा, ब्रावो आणि चार्ली अशी नावे देण्यात आली आहेत. विमानतळावर एकूण ८८ तपासणी केंद्र असतील. त्यामध्ये ६६ पारंपरिक स्वरूपातील आणि २२ स्वंय तपासणी केंद्र असतील. त्यामुळे हा देशातील अत्याधुनिक विमानतळांपैकी एक ठरणार आहे.
दरम्यान, या ऐतिहासिक उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेते शशांक केतकर यांनी केलेली एक इंस्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. शशांक यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर नवी मुंबई विमानतळाचे एक सुंदर छायाचित्र शेअर केले आहे. परंतु त्यासोबत त्यांनी लिहिलेल्या काही ओळींनी नेटिझन्सचे लक्ष वेधले आहे.
शशांक यांनी लिहिले आहे की, “आशा करता हूं की at least यहां land होते हुए नीले plastic की छते नहीं दिखेंगी! गंदगी नहीं दिखेगी!” या वाक्यांद्वारे त्यांनी नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील स्वच्छतेच्या अभावाकडे थेटपणे लक्ष वेधले आहे. नवी मुंबईच्या उड्डाणांदरम्यान विमानातून शहराकडे पाहताना अनेक ठिकाणी निळ्या प्लास्टिकच्या छपरांचा आणि अस्वच्छ वस्त्यांचा विस्तार स्पष्ट दिसतो. याच वास्तवावर शशांक यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती गौतम अदानी यांना टॅग केले आहे.