नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु होताच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ चे (टी-१) पाडकाम तातडीने सुरु होईल या चर्चेला सोमवारी अदानी अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी पुर्णविराम दिला. टी-१ टर्मिनल दरवर्षी एक कोटी प्रवाशांची हाताळणी करत असते. विस्तार आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव यापुर्वी या टर्मिनलचा काही भाग बंद करण्यात आला असला तरी प्रवाशांचा भार पहाता सद्यस्थितीत हे टर्मिनल पुर्णपणे बंद करणे शक्य होणार नाही. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलचे (टी-२) काम पुर्ण होताच यासंबंधीचा विचार करणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील टी-१ बंद केल्यास प्रवासी हाताळण्याच्या क्षमतेत मोठी घट होऊ शकते आणि सध्या तरी असे करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होताच मुंबईतील टी-१ टर्मिनल तातडीने बंद केले जाईल अशी चर्चा सातत्याने सुरु होती. सद्यस्थितीत टर्मिनल-१ काही प्रमाणात बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेगाने केली जाईल असे सांगितले जात होते. मात्र मुंबईतून होणारी आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय उड्डाणांचा विचार करता तसे लगेच करणे शक्य होणार नाही, असे अदानी एअरपोर्ट होल्डिग्ज लिमीटेडच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी सोमवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहाणी दरम्यान पत्रकारांशी विस्तृत संवाद साधला.
पाडकाम पुढे ढकलणार ..
मुंबईतील टी-१ दरवर्षी सुमारे एक कोटी प्रवाशांची हाताळणी करते. पर्यायी क्षमता पुर्णपणे उभी रहाण्यापुर्वीच टी-१ बंद केल्यास गेल्या काही वर्षात या विमानतळाने अनुभवलेली गर्दी आणि अडचणी कमी होण्याऐवजी वाढू शकतात. मुंबईतील टी-२ वरील प्रवाशांचा भार पहाता हे दोन्ही टर्मिनल एकमेकांशी अवलंबून असल्याचे अजूनही दिसते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील प्रवाशांना सामावून घेण्यासाठी तातडीने टी-१ बंद करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे हे पाडकाम पुढे ढकलण्यात आले आहे, असे बन्सल यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हातळण्याची क्षमता ठेवतो. दुसरा टप्प्यात ही क्षमता पाच कोटी पर्यत वाढेल. नवी मुंबई विमानतळाचा दुसरा टप्पा पुर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यावर मुंबईतील टी-१ चे हस्तांतरण सुरु करता येईल, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले अदानी समूहाचे अधिकारी..
मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) येथील टर्मिनल हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) सुरू झाल्यानंतर लगेच पाडण्यात येणार नाही. त्याऐवजी, या जुन्या टर्मिनलचे बंद करणे आणि पाडकाम NMIAच्या दुसऱ्या टर्मिनलच्या (T2) सुरूवातीसोबत समन्वयाने केले जाईल, जेणेकरून प्रवासी हाताळणी क्षमतेत कोणतीही घट होणार नाही, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. “आम्ही आधीच काही विस्तार आणि सुरक्षा कारणांमुळे T1 चा काही भाग बंद केला आहे, पण संपूर्ण पाडकाम लांबणीवर टाकणार आहोत. आम्ही हे पाडकाम नवी मुंबईच्या टर्मिनल 2 सुरू होण्याच्या वेळेस साधणार आहोत. सध्या, संरचनेच्या सुरक्षिततेशी तडजोड करता येत नसल्याने T1 च्या काही क्षमतेचा वापर आधीच बंद करण्यात आला आहे. काही भाग कायमस्वरूपी बंद राहतील आणि उर्वरित भाग सुरळीत चालू ठेवण्यासाठी आम्ही कामकाजात काही बदल करू,” असे अडाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अरुण बन्सल यांनी सांगितले.