शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता

ठाणे : जिल्ह्य़ात करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्यामुळे जिल्हा तसेच पालिका प्रशासाने रुग्ण उपचारासाठी रुग्णालयातील खाटांबरोबरच डॉक्टरांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासन आणि पालिका प्रशासनाकडून कंत्राटी स्वरूपात डॉक्टरांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्घ केली जात आहे. मात्र शासनापेक्षा जास्त पगार मिळत असल्यामुळे डॉक्टरांचा पालिकांकडे ओढा वाढला असून यामुळे शासनाच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात मार्च महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने जिल्ह्य़ातील आरोग्यव्यवस्थेवर ताण पडू लागला आहे. जिल्ह्य़ात रुग्ण उपचारासाठी एकूण ११ हजार ९६७ खाटा उपलब्ध असून त्यापैकी ४ हजार ३११ खाटाच शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. असे असले तरी उपचारासाठी खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांकडून वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा तसेच पालिका प्रशासनांनी रुग्णालयातील खाटांबरोबरच डॉक्टरांसह मनुष्यबळाच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासन आणि पालिका प्रशासनाने कंत्राटी स्वरूपात डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्घ केली आहे. यामध्ये डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या वेतनांमध्ये मोठी तफावत असून शासनापेक्षा पालिका प्रशासन डॉक्टरांना जास्त वेतन देत आहे. त्यामुळे डॉक्टरांचा ओढा पालिका रुग्णालयांकडे वाढला असून यामुळे शासनाच्या जाहिरातीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कमी वेतन देत असल्यामुळे..

ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांमध्ये महापालिकांनी कोविड रुग्णालये उभारली असून या ठिकाणी पालिका क्षेत्रातील रुग्णांवर उपचार केले जात आहेत, तर शासनाच्या जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्येही १८० रुग्ण सद्य:स्थिती उपचार घेत असून या ठिकाणी केवळ २५ डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांच्यावरच रुग्णालयाचा भार आहे. मध्यंतरी पालिकांनी रुग्णालये बंद केली होती. त्या वेळीही जिल्हा रुग्णालयावर रुग्णांचा भार कायम होता. तसेच सद्य:स्थिती काम करत असलेले डॉक्टर आणि कर्मचारी करोनाबाधित झाले, तर उर्वरित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो. याशिवाय, ग्रामीण भागातील भिनार, गोठेघर आणि मुरबाड या ठिकाणी कोविड रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, पालिकापेक्षा शासन कमी वेतन देत असल्यामुळे शासनाला डॉक्टरच मिळत नसल्याची माहिती मिळाली आहे.

शासनाच्या जाहिरातीकडे पाठ

गेल्या वर्षी ठाणे महापालिका आणि शासनाने कोविड रुग्णालयांमध्ये कंत्राटी स्वरूपात डॉक्टरांची भरती करण्यासाठी जाहिरात काढली होती. त्या वेळेस शासनापेक्षा पालिकेकडून जास्त वेतन दिले जात होते. त्यामुळे शासनाच्या जाहिरातीला तेव्हाही प्रतिसाद मिळाला नव्हता. आता शासनाने आणि नवी मुंबई पालिकेने डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात शासनाने डॉक्टरांना ७५ हजार ते २८ हजार वेतन देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे, तर नवी मुंबई पालिकेच्या जाहिरातीत २ लाख ५० हजार ते ६० हजार इतके वेतन देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे शासनाच्या जाहिरातीकडे डॉक्टर पाठ फिरवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच पालिकाप्रमाणे शासनाने डॉक्टरांना वेतनाची रक्कम वाढवून दिली तरच शासनाच्या जाहिरातीला डॉक्टरांचा प्रतिसाद मिळेल, असे काही डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.