Thane congress: ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडून रणनीती आखली जात असतानाच, त्यापाठोपाठ आता निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संघटनात्मक आढावा बैठक आज, गुरुवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (harshvardhan sapkal) आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay Wadettiwar)ठाण्यात येणार आहेत. आज, गुरुवार, (१८ सप्टेंबर ) सकाळी ११ वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे होणार आहे. या बैठकीपूर्वी ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिली.

निवडणूक रणनीती बाबत चर्चा

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली काँग्रेस पक्षाची ही बैठक महत्वाची मानली जात आहे. या बैठकीत पक्षातील प्रमुख नेते आगामी रणनिती, संघटनात्मक बांधणी तसेच उमेदवार निवडीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर अनेक बडे नेते काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षांमध्ये गेले. यामुळे काँग्रेस पक्षाची अवस्था तोळामासा झाली आहे. असे असले तरी ठाणे काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यांपासून विविध नागरी समस्यांवर आंदोलने करून पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार असल्याने या बैठकीच्या निमित्ताने पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.